महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ ऑगस्ट ।। उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शनिवारी ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या टोमॅटो फेक प्रकरणानंतर आता हे प्रकार थांबविण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले आहे. फक्त ‘जशास तसे’ नाही तर, ‘जशास दुप्पट तसे’ उत्तर देणे म्हणजे काय असते याची चुणूक काल तुम्ही दाखवलीत, ती पुरेशी आहे. त्यामुळे तुम्ही सगळे हे थांबवा असे माझे, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना आवाहन असल्याचे ठाकरे यांनी समाजमाध्यमांद्वारे केलेल्या आवाहनात म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वाहनताफ्यासमोर जी निदर्शने केली, ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती. माझ्या नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान विघ्न उभी करण्याचे प्रयत्न धाराशिवपासून सुरू झाले होते. या सगळ्यातून महाराष्ट्रात तणाव वाढेल अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.