महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ ऑगस्ट ।। महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना संयुक्तपणे राबविली जात असून त्याअंतर्गत सर्वच रेशनकार्डधारकांना तब्बल १३५६ आजारांवर पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. २०११ च्या जनगणेनुसार जिल्ह्यातील ४० लाख १३ हजार २५२ लाभार्थी आहेत. रेशनकार्ड व आधारकार्ड यावरून प्रत्येकाला आयुष्यमान कार्ड काढून घेता येते. त्यावरच योजनेतील प्रत्येक रुग्णालयातून रुग्णाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.
केंद्र सरकारची आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना व राज्याची महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रित करून १ जुलैपासून प्रत्येकालाच पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत करण्याचा निर्णय झाला आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, तरुण- तरुणींसह सर्वच रुग्णांना योजनेतून पाच लाख रुपयांचे दरवर्षी मोफत उपचार मिळतात.
कार्ड कसे काढायचे अन् कोठे?
आयुष्यमान भारत योजनेचे एक ॲप असून ते डाऊनलोड करून त्यावर बेनेफिशरी व ऑपरेटर लॉगिन दोन पर्याय आहेत. त्यातील बेनेफिशरी या पर्यायातून मोबाईलधारकास स्वत: कार्ड काढू किंवा त्याठिकाणी लाभार्थी म्हणून नोंदणी करू शकतो. याशिवाय योजनेतील रुग्णालयांमधील आरोग्यमित्र, आशासेविका, आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी), महा ई सेवा केंद्रांवरही आयुष्यमान कार्ड काढण्याची सोय आहे. नागरिकांना हे कार्ड मोफत काढून द्यायचे आहे.