महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ ऑगस्ट ।। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठकांवर बैठका सुरू झाल्या आहेत. काही राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा देखील केली. भाजपचा देखील विधानसभा निवडणुकीसाठी फॉर्मुला ठरला आहे. नुकताच भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीमध्ये विधानसभेच्या रणनीतीवर चर्चा झाली. भाजपने १५० पेक्षा जास्त जागा लढवाव्यात असे मत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केले.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या कोअर कमिटीची बैठकी झाली. या बैठकीमध्ये जागा वाटप आणि विधान सभेची रणनीती यावर चर्चा झाली. महाराष्ट्रात भाजपाने १५० पेक्षा जास्त जागा लढवाव्यात असे मत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विधानसभा निहाय मिळालेली मते आणि गेल्या विधानसभेत मिळालेली मते त्याचप्रमाणे सर्वेक्षण अहवाल याच्याआधारे विधानसभा निहाय उमेदवार निवडले जाणार आहेत.
गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाने ज्या जागा जिंकल्या ती जागा त्याच पक्षाकडे राहील. मात्र काही मोजक्या जागा आहेत त्यामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. जिंकून येण्याची खात्री असलेला उमेदवार महायुतीतील कोणत्या पक्षाकडे आहे याबाबत लोकसभा निकाल आणि सर्वेक्षण अहवाल याचा आधार घेतला जाणार आहे. आगामी विधानसभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जागा निश्चितीचा अधिकार कोअर कमिटीच्या बैठकीत देण्यात आल्याचीही सूत्रांनी माहिती दिली आहे.