महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ ऑगस्ट ।। Paris Olympic 2024 Rai Benjamin USA : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची सांगता झाली.. अमेरिकेने नाट्यमयरित्या चीनकडून पदकतालिकेतील अव्वल स्थान हिसकावले. अमेरिकेने १२६ पदकांसह अव्वल स्थान पटकावले, तर चीनला ४० सुवर्ण, २७ रौप्य व २४ कांस्य अशा एकूण ९१ पदकांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पॅरिसमध्ये सर्वात शेवटी महिलांची बास्केटबॉल मॅच झाली आणि त्यात अमेरिकेने अटीतटीच्या लढतीत फ्रान्सला ६७-६६ असे पराभूत करून गोल्ड जिंकले. यामुळे अमेरिकेने अव्वल स्थानवार दावा ठोकला. अमेरिकेच्या या यशात वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटूच्या लेकाचा वाटा आहे, कसं चला जाणून घेऊया…
40 G, 44 S, 42 B…
अमेरिकेने ४० सुवर्ण, ४४ रौप्य व ४२ कांस्य अशा एकूण १२६ पदकांसह अव्वल स्थान पटकावले. यामध्ये सर्वाधिक पदकं ही मैदानी स्पर्धेत अमेरिकेने जिंकली. अॅथलेटिक्समध्ये अमेरिकेने १४ सुवर्ण, ११ रौप्य व ९ कांस्य अशी एकूण ३४ पदकं जिंकली, त्यापाठोपाठ जलतरणात २८ पदकं अमेरिकेच्या नावावर आहेत. मैदानी स्पर्धेतील १४ सुवर्णपदकांमध्ये क्रिकेटपटूच्या लेकाच्या दोन पदकांचा समावेश आहे…
कोण आहे रे बेंजामिन?
अमेरिकन धावपटू रे बेंजामिन याने ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. २७ वर्षीय बेंजामिन याने गतविजेता व विश्वविक्रमी कार्स्टेन वॉर्होल्म याला पराभूत केले. त्याने ४६.४६ सेकंदात ही शर्यत पूर्ण करून कारकीर्दितील त्याचे पहिले सुवर्णपदक जिंकले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने ४६.१७ सेकंदात अंतर पार करून रौप्यपदक जिंकले होते आणि तो ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीतील जगातील दुसरा वेगवान धावपटू आहे. याशिवाय त्याने पॅरिसमध्ये ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीतही सुवर्णपदक जिंकले.
न्यू यॉर्कमध्ये जन्म झालेल्या बेंजामिनने पहिली शर्यत ही अँटीग्वा व बार्बुडा येथील राष्ट्रीय स्पर्धेत खेळली, कारण त्याचे वडील हे कॅरेबियनवासी होते. २०१३ मध्ये जागतिक युवा अजिंक्यद आणि २०१५ मध्ये जागतिक रिले स्पपर्धेत अँटिग्वाचे प्रतिनिधित्व त्याने केले होते. पण, त्याला अमेरिकेकडून खेळायचे होते आणि २०१८ मध्ये त्याला ही संधी मिळाली.
https://www.instagram.com/kingben/?utm_source=ig_embed&ig_rid=695930f1-9bb5-4ba5-8344-9d4fbeefb01a
बेंजामिन अन् क्रिकेट कनेक्शन…
बेंजामिन हा वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटूट विन्स्टन बेंजामिन यांचा मुलगा आहे. त्यांनी वेस्ट इंडिजकडून २१ कसोटी व ८५ वन डे सामने खेळले असून १०० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. १९८७ व १९९२ च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील संघाचे ते सदस्य होते. रे यानेही वडिलांसारखा जलदगती गोलंदाज होण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यातील कौशल्य पाहून प्रशिक्षकांनी त्याला धावपटू होण्याचा सल्ला दिला.