महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑगस्ट ।। राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राजकीय पक्षाचे नेते कामाला लागले असून मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी एक खळबळजनक दावा केलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांचा पराभव होणार, असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय.

अंबादास दानवे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. आज शनिवारी सकाळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी दानवे यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली. त्याचबरोबर काँग्रेसचा देखील खरपूस समाचार घेतला. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेप असल्यास काँग्रेसने जाहीर करावं, असं अंबादास दानवे म्हणाले.
मुळात महाविकास आघाडी आणि महायुती दोघांकडेही उद्धव ठाकरेंसारखा चेहरा नाही. त्यांच्या मागे जनमत असून ते महाविकास आघाडीतील एक आश्वासक चेहरा आहे, असा दावाही अंबादास दानवे यांनी केला. महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत सध्या बोलणे ठीक राहणार नाही, असंही दानवे म्हणाले.
राज्यात आणि देशात हिंदुत्ववादी सरकार आहे मग आक्रोश कोणाकडे करायचा? महायुती सरकार दंगली सरकार पुरस्कृत आहेत, अशी टीकाही दानवे यांनी केली. सरकारला त्यांच्या कामावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे दंगली घडवून मतांची विभागणी करायची आहे.
अजित पवारांचा बारामतीतून पराभव होणार?
अजित दादा असतील किंवा छगन भुजबळ असतील यांच्या पक्षाचा पराभव विधानसभेत अटळ आहे. अजित पवार हे बारामतीतून लढणार नाही अशा चर्चा फक्त निवडणुकीतून लक्ष विचलित करण्यासाठी केल्या जात आहेत. मुळात इतर मतदारसंघातील लोक यांना स्वीकारणार नाहीत हे त्यांना कळून चुकलं आहे, असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला.