महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ ऑगस्ट ।। इंदापूर विधानसभेचा राजकीय निर्णय देवेंद्र फडणवीस जो घेतील तो मला मान्य असेल व त्याला पाठिंबा असेल, असे अजित पवार यांनी कबूल केल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी ही जागा आपल्याकडेच असल्याचा दावा केला आहे. लोकसभेपूर्वी अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या चर्चेचा तपशीलही त्यांनी सांगितला. इंदापूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले हर्षवर्धन पाटील?
“लोकसभेच्या निवडणुकीवेळी आमचे नेते देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि माझ्यात चर्चा झाली होती. राजकारणामध्ये बंद दाराआड झालेल्या चर्चा सांगायच्या नसतात. मात्र त्या चर्चेमध्ये अजित पवार यांनी इंदापूर विधानसभेचा राजकीय निर्णय देवेंद्र फडणवीस जो घेतील तो मला मान्य असेल व त्याला माझा पाठिंबा असेल,” असे कबुल केल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
तसेच “त्यानंतर झालेल्या प्रचार सभांमध्येही भाषणांत अजितदादांनी हेच म्हटलं होतं. त्यासह फडणवीसांनी इंदापूर आणि मुंबईत तेच सांगितलं होतं. इंदापूरची जागा कोणत्या पक्षाला जाते, यावर अजून बरीच चर्चा बाकी आहे. जे ठरलं होतं, त्यानुसार आमचे नेते निर्णय घेतील,” असं म्हणत एकप्रकारे हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरची जागा भाजपला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीची परिस्थिती वेगळी होती आता तीन महिन्यात विधानसभेचे गणित बदलले. कोणत्याही निवडणूकीत जनता काय करायचं हे ठरवते. आम्ही शक्तीस्थळ असल्यानेच टार्गेट केले जाते. कदाचित काहींना आमची भिती वाटत असेल, आम्ही शक्तीस्थळ असल्यामुळेच हल्ले होतात, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.