Kolkata Rape Case: CJI चंद्रचूड आज काय बोलणार? संपूर्ण देशाचं लक्ष सुप्रीम कोर्टाकडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑगस्ट ।। सर्वोच्च न्यायालयामध्ये आज कोलकात्यामधील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या घटनेची स्वत:हून दखल घेत याचिका दाखल करुन घेतली आहे. आज सकाळी न्यायालयाचा कारभार सुरु होईल तेव्हा सर्वात आधी या याचिकेवर सुनावणी केली जाणार आहे. सकाळी साडेदहा वाजल्यापासून न्यायालय सुरु होत असल्याने याचवेळी हे खंडपीठ सदर प्रकरणावर बाजू ऐकून आपली टीप्पणी करेल. या प्रकरणी देशातील न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर असलेले न्या. चंद्रचूड काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागू राहिलेलं आहे.

उच्च न्यायायलयाने या पूर्वीच दिलेत आदेश
“कोलकाता येथील आर. जी. कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येची घटना आणि संबंधित प्रकरण” या मथळ्याखाली सर्वोच्च न्यायालयानेच याचिका दाखल करुन घेतली आहे. या प्रकरणामध्ये न्यायालयीन मार्गाने सदर समस्येवर न्यायालय काय भाष्य करतं हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे कोलकाता उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून उच्च न्यायालयाने यापूर्वीच सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयची टीम कोलकात्यामध्ये पोहोचली आहे. सीबीआयच्या टीमने या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवणे, चौकशी करणे सुरु केलं आहे.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
9 ऑगस्ट रोजी 31 वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आर. जी. कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये आढळून आला. नुकत्याच समोर आलेल्या शवविच्छेदन अहवालामध्ये या तरुणीच्या शरीरावर 16 बाह्य आणि नऊ अंतर्गत जखमा असल्याचं उघड झालं असून सर्व जखमा मृत्यूपूर्वीच्या असल्याचं नमूद केलं आहे. या तरुणीचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. हाताने गळा दाबल्याने गुदमरुन तिचा मृत्यू झाला. हत्येआधी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं शवविच्छेदनातून स्पष्ट झालं आहे. पीडितेचे गाल, ओठ, नाक, मान, हात आणि गुडघ्यांवर ओरखडे आढळून आले. तसेच तिच्या गुप्तांगावरही जखमा आढळून आल्या. मान, टाळू आणि इथर भागांच्या स्नायूंमध्ये नऊ अंतर्गत जखमा आढलून आल्या.

राज्यपाल दिल्लीत दाखल
दरम्यान, पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस हे याच प्रकरणाची चर्चा करण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. बोस हे आज राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याबरोबरच अनेक राष्ट्रीय नेत्यांना भेटून देशभरामध्ये चर्चेत असलेल्या या प्रकरणाचे अपडेट्स देतील अशी माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *