![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑगस्ट ।। Janmashtami 2024 : श्रावणात सणांची मोठी रेलचेल पाहायला मिळते. नुकताच नारळी पौर्णिमेचा अन् रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. आता सर्वांना वेध लागलेत ते श्रीकृष्ण जन्माष्टमीचे.
हिंदू धर्मामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्व आहे. भगवान विष्णूंचा आठवा अवतार म्हणून श्रीकृष्णाला पुजले जाते. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा आणि उपवास केला जातो. भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमीचे आणि गोपाळकाल्याचे खास महत्व आहे. ही गोकुळाष्टमी देशभरात विविध नावांनी साजरी केली जाते. या सणाला विविध प्रकारच्या परंपरा देखील लाभल्या आहेत.
वैदिक पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा ही गोकुळाष्टमी श्रावणात आल्याने दुर्मिळ योग तयार झाला आहे. यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण २६ ऑगस्टला (सोमवारी) देशभरात साजरा केला जाणार आहे. या श्रीकृष्णजयंतीचा शुभ मुहूर्त अन् पुजेची पद्धत काय? ते आपण जाणून घेणार आहोत.
श्रीकृष्ण जन्माष्टमीची तिथी अन् शुभ मुहूर्त
वैदिक पंचांगानुसार, श्रीकृष्ण जन्माष्टमी तिथीची सुरूवात रविवार २५ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३ वाजून ३९ मिनिटांनी सुरू होईल. त्याचवेळी सोमवारी २६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २ वाजून १९ मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल.
त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये उदय तिथीनुसार २६ ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी सर्वत्र साजरी केली जाईल. जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त हा सकाळी १२:०१ पासून ते १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे, या कालावधीमध्ये तुम्ही श्रीकृष्णाची पूजा करू शकता.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पुजेची पद्धत :
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे.
स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवाचे नामस्मरण करावे.
सूर्य देवतेला जल अर्पण करावे.
त्यानंतर, देवघरातील श्रीकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा चौरंग अथवा पाटावर मांडावी.
तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती ताम्हणात घेऊन त्यावर गंगाजल किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा.
त्यानंतर, मुर्तीला दूध किंवा पंचामृताने स्नान घालावे.
त्यानंतर, गोपी चंदनाचा टिळा मुर्तीला अथवा प्रतिमेला लावावा.
आता तुमच्या बाळकृष्णाचा साजऋंगार करा, फुलांच्या माळा अर्पण करा.
मुर्तीसमोर तुपाचा दिवा किंवा निरांजन लावून, धूप-अगरबत्ती लावा.
त्यानंतर, बाळगोपाळाची आरती करा आणि मनोभावे प्रार्थना करून साखर, मिठाई किंवा फळाचा नैवेद्य दाखवा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.