महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑगस्ट ।। लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील भाजपच्या दिग्गज नेत्याने पक्षाला धक्का दिला आहे. रवी लांडगे भारतीय जनता पक्षाची साथ सोडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीसाठी हा मोठा हादरा मानला जात आहे.
रवी लांडगे आज मुंबईत ‘मातोश्री’वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधणार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप नेते महेश लांडगे यांना भोसरी विधानसभेमध्ये मोठा धक्का बसणार आहे.
महेश लांडगे यांनी भाजपचा विचार सोडला असून ते आता वैयक्तिक राजकारण करत आहेत. त्यामुळे विकासाला खीळ बसली आहे. आपण भाजपला सोडून उद्धव ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचे रवी लांडगे यांनी सांगितले आहे. रवी लांडगे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माझी विरोधी पक्ष नेते आहेत. त्यातच ते महेश लांडगे यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात. त्यांच्या या प्रवेशाने महेश लांडगे यांना झटका बसणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भाजपचे माजी शहराध्यक्ष, दिवंगत नेते अंकुशराव लांडगे यांचे ते पुतणे आहेत. तसेच माजी विरोधी पक्ष नेते बाबासाहेब लांडगे यांचे ते पुत्र आहेत. घरातूनच राजकीय वारसा मिळाल्याने लहानपणापासूनच रवी लांडगे राजकारणात सक्रिय आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत.