महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑगस्ट ।। सणासुदीचा काळ सुरू झाला असून याचा फायदा घेत विमानप्रवास आता ‘खिशाबाहेर’ जाऊ पहात आहे! आगामी ओणम आणि दिवाळी या दोन महत्त्वाच्या सणांसाठी आत्तापासून विमानाच्या तिकीटांचे आरक्षण सुरू झाले आहे. हे आरक्षण करताना एकदिशा विमान प्रवासासाठी देशांतर्गत १० ते १५ टक्के शुल्कवाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय विमानप्रवासासाठी एकदिशा विमान प्रवासासाठी २० ते २५ टक्के शुल्क वाढल्याचे निदर्शनास आले आहे. इग्झिगो या ट्रॅव्हल पोर्टलने वृत्तसंस्थेसाठी केलेल्या ताज्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
विमान तिकीटांच्या आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण करताना इकॉनॉमी श्रेणीतील आरक्षणांचाल विचार केला गेला आहे. उदाहरणार्थ, ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात दिल्ली ते चेन्नई या हवाईमार्गासाठी एकदिशा तिकीटांसाठी २५ टक्के भाववाढ होऊन ते तिकीट ७,६१८ रुपये किंमतीला आरक्षित होताना दिसत आहे. गेल्यावर्षी १० नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या काळातील दिल्ली-चेन्नई विमानप्रवासाच्या भाड्याशी तुलना करता ही आकडेवारी मिळाली आहे. काही विमानमार्गांसाठी प्रवासी भाड्यात १ ते १६ टक्के वाढ झाली आहे.
दिल्ली-चेन्नई, मुंबई-बेगळुरू आणि दिल्ली-हैदराबाद हे विमानमार्ग सर्वाधिक लोकप्रिय विमानमार्ग आहेत. या मार्गांसाठी एकदिशा प्रवासी भाडे चार हजार ते पाच हजार रुपये आकारले जात आहे. ही वाढ गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १० ते १५ टक्के दिसून येत आहे.
केरळ राज्यातील विविध शहरांत जाण्यासाठी होत असलेल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आरक्षणांमध्येही शुल्कवाढ दिसून येत आहे. काही मार्गांवर तर १ टक्का ते २५ टक्के इतकी शुल्कवाढ झालेली आहे. ओणमसाठी गेल्यावर्षी २० ऑगस्ट ते २९ ऑगस्ट यासकाळात केरळसाठी विमानप्रवास आरक्षणे मोठ्या प्रमाणावर झाली. तशीच यंदा ६ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या काळात होत असून या आरक्षणांचा विचार केल्यास काही मार्गांसाठी शुल्क ६ ते ३५ टक्के घसरल्याचेही दिसून येत आहे.
गृहिणींचे बजेट कोलमडले! सणासुदीत ‘चणाडाळ’ शंभरीच्या उंबरठ्यावर; मागणीत २५ टक्के वाढीची शक्यता
यावर्षी ६ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या काळासाठी हैदराबाद-थिरुवनंतपूरम विमानप्रवास शुल्क ३० टक्क्यांनी वाढून ४,१०२ रुपये झाले आहे. मुंबई-कालिकत विमानप्रवास शुल्क ४,४४८ रुपये झाले आहे.
एकदिशा विमानशुल्क (रु)
विमानमार्ग २०२४ टक्के
दिल्ली-चेन्नई ७,६१८ — २५ (वाढ)
मुंबई-हैदराबाद ५,१६२ — २१ (वाढ)
दिल्ली-गोवा ५,९९९ — १९ (वाढ)
दिल्ली-अहमदाबाद ४,९३० — १९ (वाढ)
मुंबई-अहमदाबाद २,५०८ — २७ (घट)
मुंबई-उदयपूर ४,८९० — २५ (घट)
बेंगळुरू-हैदराबाद ३,३८३ — २३ (घट)
मुंबई-जम्मू ७,८२६ — २१ (घट)