Pune Ganeshotsav 2024: पुण्यातील गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर; काय आहेत ११ अटी अन् शर्ती? वाचा सविस्तर…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑगस्ट ।। गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने सार्वजनिक गणपती मंडळांची लगबग सुरू झाली आहे. बाप्पाच्या आगमनसाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आतुर झाले आहेत. यंदा ७ सप्टेंबरला बाप्पाचे आगामन होईल तर १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असेल. गणपती मंडळांसोबतच प्रशासनाही १० दिवस चालणाऱ्या या उत्सवाची तयारी सुरू केली असून पुणे शहरातील सार्वजनिक मंडळांसाठी मिरवणूक, वाहतूककोंडी याबाबत मार्गदर्शक सूचना तसेच नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

गणेशोत्सव २०२४
पुण्यातील गणशोत्सवात पोलिसांकडून मंडळांना मिरवणूक, वाहतूककोंडी याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. नव्या मंडळाच्या परवानगीसाठी असलेल्या अटी-शर्ती यांची यादी पोलिसांनी जाहीर केली आहे. गेल्यावर्षी एका गणेश मंडळाच्या मिरवणुकीत एका ढोल पथकात ५० ढोल आणि १० ताशा अशी संख्या निश्चित करण्यात आली होती.

पोलिसांकडून नियमावली जाहीर!
यंदा देखील तीच संख्या निश्चित करण्यात आली असून, जास्तीत जास्त ३ ढोल पथकांचा समावेश गणेश मंडळांना करता येणार आहे. ती संख्या निश्चित करून पोलिसांना सांगा, अशा सूचनादेखील गणेश मंडळांना करण्यात आल्या आहेत. तसेच नवीन मंडळांच्या परवानगीसाठी प्रशासनाने अटी अन् शर्ती घालून दिल्या आहेत.

काय आहेत नियम अन् अटी?
१. २०२२ मध्ये परवानगी घेतलेल्या गणेश मंडळांना २०२६ पर्यंत (५ वर्षे) परवानगी.

२. नवीन गणेश मंडळांची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी व त्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे.

३. मिरवणुकीत देखाव्यांची उंची जमिनीपासून १४ फुटांपेक्षा जास्त आणि रुंदी १० फुटांपेक्षा जास्त नसावी.

४. रात्री १० पर्यंत कार्यक्रमांना परवानगी.

५ . कमान, स्टेज आणि मंडप उभारण्यासाठी अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र, वाहतूक शाखेचे, विद्युत जोडणीसाठी विद्युत निरीक्षकाचे प्रमाणपत्र यासाठी एक खिडकी योजना.

६. परवानगी घेतलेल्या आकाराचाच मंडप उभारणे आवश्यक.

७. गणेश मंडळात सीसीटीव्ही असणे बंधनकारक.

८. महिलांची छेडछाड होणार नाही याची याबाबत दक्षता ठेवणे गरजेचे.

९. धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे.

१०. प्रखर बीम लाइट नको.

११. दोनच स्पीकर लावून आवाजाची मर्यादा पाळावी.

दरम्यान, गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अधिक सुधारणा केल्या जाणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीचे नियोजन चांगल्या प्रकारे केले जाणार आहे. विसर्जनावेळी दोन मंडळांमध्ये अंतर पडू न देता मिरवणूक प्रवाही राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *