महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑगस्ट ।। ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या शाळेत (badlapur school case) दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर मंगळवारी शहरात तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बदलापूर शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अंबरनाथ-कर्जत मार्गावरील लोकल सेवा मंगळवारी सायंकाळी ७ वाजता सुरु झाली. बदलापूरमध्ये सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून येथील तणाव निवळला आहे. दरम्यान, बदलापूरमधील सर्व शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई आज बदलापूर येथे येणार आहेत. ते दुपारी १ वाजता पोलीस स्थानकाला भेट देतील. तसेच शिक्षणमंत्री दीपक केसरकर सायंकाळी ४ वाजता पालकांची भेट घेणार आहेत. मध्य रेल्वेचे डीसीपी, जीआरपी, मनोज पाटील यांनी सांगितले की, ” येथील परिस्थिती सामान्य आहे. रेल्वेची वाहतूकही सुरळीत आहे.”
३०० लोकांवर एफआयआर, ४० हून अधिक जणांना अटक
या घटनेच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या सुमारे ३०० लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांनी ४० हून अधिक जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.