महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑगस्ट ।। बदलापूर येथे नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर लैंगिंक अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदेला पोलिसांनी आज कल्याण न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत २६ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. तर आता आरोपी अक्षय शिंदेंचं वकीलपत्र घेण्यास वकिलांनी नकार दिल्याचं कळत आहे. कल्याण न्यायालयातील वकिलांनी त्याचं वकीलपत्र घेण्यास नकार दिला आहे.
बदलापूरचं कृत्य निंदनीय आहे, जनावरांनाही लाज वाटेल असं आहे. ज्या मुलींना काहीही कळत नाही, ज्यांचं अंगाखांद्यावर खेळायचं वय आहे, अशा साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अतिप्रसंग करणे घातक आहे. असे आरोपी समाजात वावरणे हे समाजासाठीही घातक आहे. त्यामुळे असे आरोपी तुरुंगातून बाहेर येऊच नये, यासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे. त्यामुळे आमच्या संघटनेने असं ठरवलं आहे की त्याचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये. आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. पण, आम्ही वकिलांनी त्याचं वकीलपत्र घेतलं नाही, असं वकिलांनी सांगितलं.
अक्षय शिंदेला न्यायालयात हजर केलं
नराधम आरोपी अक्षय शिंदेला सकाळी साडेदहा वाजता मोठ्या पोलीस बंदोबस्तात कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याला दिलेली पोलीस कोठडी ऐज २१ ऑगस्टला संपणार होती. पोलिसांनी न्यायालयात त्याची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर कोर्टाने २६ ऑगस्टपर्यंत त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली.
चिमुकलींवर शाळेतच लैंगिक अत्याचार
अक्षय शिंदेवर बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर बदलापुरात एकच जनआक्रोश माजला. बदलापूरकरांनी शाळेसमोर आणि रेल्वे स्थानकात आंदोलन केले. तब्बल १०-११ तास हे आंदोलन सुरु होतं. यामुळे काल बदलापुरात जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला. बदलापूरकरांनी तीव्र आंदोलन पुकारत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली. दिवसभर त्यांनी रेल्वे रुळावर ठिय्या मांडला. पोलिस आणि गिरीष महाजन यांनी अनेक तास त्यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. पण, आंदोलनकर्ते त्यांच्या मागणीवर ठाम होते.