महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑगस्ट ।। बदलापुरात चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना दुर्दैवी आहे परंतु घटनेच्या निषेधार्थ झालेले आंदोलन राजकीय दृष्टीने प्रेरित होते. आंदोलनात स्थानिक लोक असायला हवे होते. तिथे स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतपत होते. बाकी सगळे आंदोलक बाहेरचे होते. इतर ठिकाणांवरून गाड्या भरून लोक येत होते. मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांची समजूत काढूनही लोक ऐकायला तयार नव्हते. सरकारला बदनाम करण्यासाठी मंगळवारी बदलापूरमध्ये आंदोलन झाले, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. चिमुरड्यांच्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आलेल्या आंदोलकांच्या हातात लाडकी बहीण योजनेविरोधातले बॅनर कसे काय आले? असा सवालही त्यांनी विचारला.
बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेच्या शिशू वर्गातील दोन विद्यार्थिनींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकरांनी मंगळवारी ‘बदलापूर बंद’ची हाक दिली होती. मात्र, सकाळी सहाच्या सुमारास हजारोच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाला शाळा प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला. हाच उद्रेक राजकीय प्रेरित असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
आंदोलकांच्या हातात लाडकी बहीण योजनेविरोधातले बॅनर कसे काय आले?
आंदोलकांच्या मागण्या सरकारने मान्य करूनही ते रेल्वे रुळावरून उठत नव्हते. त्याचवेळी अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आलेल्या आंदोलकांच्या हातात लाडकी बहीण योजनेविरोधातले बॅनर कसे काय आले? लाडकी बहीण योजना नको, लेक सुरक्षा योजना हवी, असे लोक कसे काय म्हणू लागले? याचाच अर्थ त्यांना, सरकारला बदनाम करायचं होतं, असा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.