महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ ऑगस्ट ।। अर्थ मंत्रालयाने मासिक आर्थिक पुनरावलोकन अहवाल सादर केला आहे ज्याने भारतीय अर्थव्यवस्थेचे (इकॉनॉमी) सोनेरी चित्र मांडले आहे. चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या चार महिन्यात भारतीय अर्थव्यवस्थेने आपला वेग कायम ठेवल्याचे अर्थ मंत्रालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे. जुलै महिन्यासाठी जारी केलेल्या मासिक आर्थिक अहवालानुसार भारतीय इकॉनॉमीने जुलै २०२४ मध्ये विविध आर्थिक निर्देशकांवर मजबूत कामगिरी दर्शविली आहे. कर बेसचा विस्तार आणि आर्थिक क्रियाकलाप वाढल्यामुळे सर्वकाही शक्य झाले.
एवढेच नाही तर अनियमित मान्सून असूनही भारताची आर्थिक गती अबाधित आहे आणि आर्थिक सर्वेक्षणात जीडीपी वाढीचा अंदाज ६.५ ते ७ टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज अर्थ मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या अहवालात वर्तवला आहे.
आर्थिक क्रियाकलाप तेजीची चिन्हे
गुरुवारी, २२ ऑगस्ट २०२४ रोजी अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या आर्थिक विभागाने जुलै २०२४ चा मासिक आर्थिक आढावा प्रसिद्ध केला. यानुसार, मे २०२४ नंतर जुलै २०२४ मध्ये सर्वाधिक जीएसटी संकलन झाले असून ग्रॉस जीएसटी महसूल दरवर्षी १०.३% वाढला आणि एप्रिल-जुलैपर्यंत संकलन ७.४ लाख कोटी रुपये होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत सरासरी जीएसटी संकलन १.८५ लाख कोटी रुपये आहे, जे २०२३-२४ या आर्थिक वर्षात सरासरी १.६८ लाख कोटी रुपये होते. जुलै २०२४ मध्ये ई-वे बिल निर्मिती आर्थिक क्रियाकलापांमध्ये वाढ दर्शवते.
उत्पादन आणि सेवा क्षेत्रासाठी खरेदी व्यवस्थापकांच्या निर्देशांकांची मजबूत कामगिरी देखील देशांतर्गत क्रियाकलापांची ताकद दर्शवते, असे अर्थ मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे. तसेच उत्पादन क्षेत्रातील वाढ मागणीत वाढ, नवीन निर्यात ऑर्डरमध्ये वाढ आणि उत्पादन किंमती वाढल्यामुळे आहे. त्याचवेळी, आर्थिक आघाडीवर आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पाने वित्तीय एकत्रीकरणाचा मार्ग मोकळा केल्याचेही म्हटले असून मजबूत महसूल संकलन, महसुली खर्चातील शिस्त आणि मजबूत आर्थिक कामगिरी यामुळे वित्तीय तूट कमी होण्याची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त नवीन खाजगी गुंतवणुकीच्या चक्राला आधार देत भांडवली खर्च उच्च पातळीवर ठेवला गेला आहे.
महागाई कमी होतेय
जुलै २०२४ मध्ये किरकोळ महागाई ३.५ टक्क्यांपर्यंत घसरली आहे, जी सप्टेंबर २०१९ पासून सर्वात कमी असल्याचे अहवालत नमूद करण्यात आले. अन्नधान्याच्या चलनवाढीतील नफ्याचा परिणाम असल्याने सांगितले गेले. तसेच नैऋत्य मान्सूनच्या स्थिर प्रगतीमुळे खरिपाच्या पेरणीला चालना मिळाली असून सध्याच्या खरीप आणि आगामी रब्बी पिकांच्या उत्पादनासाठी जलाशयातील पाण्याची वाढती पातळी चांगली असल्याचे अहवलात म्हटले आहे. अशा स्थितीत, येत्या काही महिन्यांत अन्नधान्य महागाई कमी होण्यास मदत होईल.