महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ ऑगस्ट ।। आयकर विवरणपत्र (आयटीआर) फाईल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. आयकर विभागाच्या माहितीनुसार देय तारखेपर्यंत ७.२८ कोटींहून अधिक लोकांनी टॅक्स रिटर्न भरले ज्यापैकी ७.१० कोटी रिटर्नची पडताळणी करण्यात आली असून इन्कम टॅक्स विभागाने ५.१५ कोटी रिटर्नवर प्रक्रियाही केली आहे. म्हणजे आता उर्वरित दोन कोटी रिटर्नवर प्रक्रिया अजून व्हायची आहे.
करदात्यांना आयकर परतावा आता दहा दिवसांपेक्षा कमी कालावधीत केला जात आहे असा दावा सरकारने केला ज्यासाठी २०१४ मध्ये ५३ दिवस लागायचे. पण आता प्रश्न असा आहे की सर्व टॅक्स परताव्याची प्रक्रिया दहा दिवसांत होते आणि त्यांना परतावा मिळतो का? वास्तविक स्थिती अशी आहे की अनेक लोक अजूनही आयकर परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत.
तुम्ही कोणता ITR फॉर्म भरला आहे?
तुम्ही फाईल केलेल्या आयटीआरवर प्रक्रिया न होणे आणि परतावा मिळण्यास उशीर होण्याचे कारण जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही कोणता ITR फॉर्म निवडला आहे याकडे लक्ष द्या. आयटीआर-1 किंवा आयटीआर-4 फॉर्म लवकर तपासले जातात पण आयटीआर-2 आणि आयटीआर-3 फॉर्मवर प्रक्रिया म्हणजे हे फॉर्म तपासण्यासाठी सहसा जास्त वेळ लागतो. याशिवाय एखाद्याचा कर परतावा जास्त असला तरी टॅक्स रिटर्न तपासण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो. तसेच टॅक्स रिटर्नमध्ये दिलेली माहिती चुकीची असल्याचे अनेक वेळा कर विभागाच्या निदर्शनास येते. जसे की इन्कम आणि टॅक्स क्रेडिट विषयी दिलेली माहिती एकमेकांशी जुळत नसल्या कर विभागाला उलट माहिती पुन्हा तपासावी लागेल.
कर परतावा मिळण्यास किती वेळ लागणार
अशा स्थितीत, वरील सर्व गोष्टी करदात्यांना लक्षात ठेवून आयटीआर फॉर्म करावा. यासर्व गोष्टी लक्षात घेऊन कर परतावा मिळण्यासाठी किती वेळ लागू शकतो याची माहिती मिळेल. आयकर विभागाने ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत कर विवरणपत्रे तपासायची आहेत. त्यामुळे काही कारणास्तव टॅक्स रिटर्न तपासण्यात विलंब होत असेल, तर कर विभागाला इतका वेळ घेण्याचा अधिकार आहे.
टॅक्स रिफंडला उशीर झाल्यास काय?
तुम्ही आयटीआर फाईल करून अधिक दिवस उलटले आहेत आणि अद्यापही परतावा खात्यात जमा झाला नसेल तर टोल फ्री क्रमांक १८००-१०३-४४५५ वर कॉल करू शकता किंवा ask@incometax.gov.in वर ईमेल करून तुमची शंका दूर करू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या जवळच्या आयकर कार्यालयात जाऊन चौकशी करू शकता. एवढं करूनही तुम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, तर तुम्ही आयकर वेबसाइटवर जाऊन ‘e-Nivaran’ विभागात तक्रार नोंदवू शकता.
करदात्यांनी कर परताव्याची स्थिती नियमितपणे तपासली पाहिजे. तुम्हाला कोणतीही अडचण येत असेल त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. आजच्या काळात कर परतावा ट्रॅक करणे आणि व्यवस्थापित करणे पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे.