Mumbai-Goa Highway: गणेशोत्सवासाठी सरकारचा मोठा निर्णय ; ‘मुंबई-गोवा’वर जड वाहनांना बंदी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ ऑगस्ट ।। गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूकबंदी करण्याचे आदेश राज्य सरकारने शुक्रवारी केले. ५ सप्टेंबरपासून ते ८ सप्टेंबरपर्यंत तसेच पाच व सात दिवसांच्या आणि गौरी-गणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवासासाठी ११ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी १७ आणि १८ सप्टेंबर रोजी ही बंदी असेल.

राज्यभरात ७ सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. उत्सवासाठी कोकणवासीय मोठ्या संख्येने गावाकडे जात असतात. त्यातच जड वाहने रस्त्यावर असल्यास वाहतूककोंडी निर्माण होऊ शकते, ते टाळण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वर १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना मुंबई ते सावंतवाडीदरम्यान बंदी करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा प्रवास म्हणून ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ ते ८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत, त्यानंतर तर पाच व सात दिवसांच्या गणेशमूर्तीचे तसेच गौरी विसर्जन आणि परतीच्या प्रवासासाठी ११ सप्टेंबर रात्री ८ वाजल्यापासून ते १३ सप्टेंबर रात्री ११ वाजेपर्यंत, अनंत चतुर्दशी ११ दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन आणि परतीच्या प्रवासाकरिता १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते १८ सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंत ही बंदी राहील. हा कालावधी वगळता इतर वेळी जड वाहनांची वाहतूक नियमितपणे सुरू राहील.

जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांना मुभा
दूध, पेट्रोल किंवा डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना ही बंदी लागू राहणार नाही. तसेच महामार्ग क्र. ६६ च्या कामाशी संबंधित वाहनांनाही ही बंदी लागू नसेल. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा आणि महामार्गांचा विचार करून पोलिस आयुक्त, नवी मुंबई आणि संबंधित जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक यांनी जड, अवजड वाहनांवरील निर्बंध शिथिल करण्याबाबत प्राप्त परिस्थितीनुसार आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा. तसेच जेएनपीटी व जयगड बंदरातून आयात-निर्यात मालाची वाहतूक सुरू राहील याकरिता वाहतुकीचे नियेाजन करण्यात यावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *