महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ ऑगस्ट ।। पुण्यामध्ये कालपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला असून आजही पावसाची संंततधार सुरूच आहे. शहरामध्ये जोरदार पाऊस सुरू असून डेक्कन परिसरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. हवामान विभागाने आजही रेड अलर्ट दिला असून प्रशासनाने शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पुण्यात पावसाचा जोर वाढला
पुण्यामध्येही कालपासून पावसाची संततधार सुरू असून शहरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. खडकवासला धरण परिसरात रिमझिम पाऊस सुरू असून खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 35 हजार 310 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काल संध्याकाळपासून खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग मुठा नदीपात्रात सुरू असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर डेक्कनला झेड ब्रिज पाणी भरल त्याला अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे.
मध्यरात्री गाड्या काढण्यासाठी धडपड
शहरात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नदीपात्र प्रवाही झाले आहे. खडकवासला धरणातून ३५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने पाणी वाहण्याचा वेग वाढला आहे. अशातच मध्यरात्री नदीत वाहून जाणाऱ्या गाड्या वाचवण्यासाठी पुणेकरांची धडपड सुरू होती. जिव धोक्यात घालून गाड्या नदीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात होते.
घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस
पुण्यातील घाट माथा आणि धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस बरसतोय भोर वेल्हा मुळशी मावळ या भागात कालपासून जोरदार पासून आहे. अनेक भागात 100 मिलिमीटरच्या वर पावसाची नोंद झाली आहे. दासवे लवासा भागात 166 मिलिमीटर पाऊस झाला आहे तर मुळशी 194 मिलिमीटर, वेल्हा 150 मिलिमीटर, मावळ 144 मिलिमीटर, भोर कुंरुंजी 139 मिलिमीटर पाऊस झाल्याने धरणांच्या पाण्यात प्रचंड वाढ झाली आहे.
सध्या खडकवासला धरणातून 35 हजार 310 क्युसेकनी विसर्ग सुरू आहे. पानशेत धरणातून 8 हजार 320 क्युसेकनी विसर्ग सुरू आहे. तर वरसगाव धरणातून 6 हजार 395 क्युसेकनी विसर्ग सुरू आहे. दरम्यान, येत्या तीन ते चार दिवसांत राज्यभरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.