महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ ऑगस्ट ।। काही दिवसांच्या ब्रेकनंतर राज्यात शुक्रवारी आणि शनिवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. संपूर्ण कोकणासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत असून तलावांमधील पाणीसाठा वाढला आहे. आज रविवारी देखील राज्यात पावसाची अशीच परिस्थिती राहणार असून, अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई-पुण्यात कोसळणार पाऊस
आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज रविवारी मुंबईसह उपनगर, पुणे, कोकण, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर साताऱ्यासह घाटमाथ्यावर देखील तुफान पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय.
हवामान तज्ज्ञ के.एस होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कमी दाबाच्या क्षेत्रापासून कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राचा किनारा ते उत्तर केरळ किनारपट्टी भागात सक्रिय आहे. त्यामुळे आज रविवारपासून पुढील 4-5 दिवसांत राज्यात मुसळधार-अतिमुसळधार पावसाची शक्यता.
राज्याला मुसळधार पावसाचा इशारा
मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच सोलापूर जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने आज मुंबई पालघऱ, ठाणे, रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
23 Aug:महाराष्ट्र किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र.
कमी दाबाच्या क्षेत्रापासून कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राचा किनारा ते उत्तर केरळ किनारपट्टी. (offshore trough)
पुढील 4, 5 दिवसांत राज्यात मुसळधार-अतिमुसळधार पावसाची शक्यता.काही ठिकाणी मेघगर्जनेसह.
IMD pic.twitter.com/4yDwVuiPpm— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 23, 2024
गोदावरी नदीला महापूर
नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्या दमदार पावसाने गोदावरी नदीला पूर आलाय. गंगापूर धरणातून 7000 क्युसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत करण्यात आलाय. शनिवारी नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुराचे इंडिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छाती एवढं पाणी आलं होतं. त्याचबरोबर पुरामुळे गोदा घाटावरचे छोटे-मोठे मंदिर गेले पाण्याखाली गेले होते.
पावसाचा जोर कायम राहिलास गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने गोदावरी नदीत वाढवणार पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. दुसरीकडे पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्यात आला आहे. मुळा, मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बाबा भिडे पूल देखील पाण्याखाली गेलाय. पुण्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे.