हर्षवर्धन पाटील लवकरच मोठा निर्णय घेणार? भाजपाला जबर धक्का बसण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ ऑगस्ट ।। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. राजकीय नेते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागले आहेत. काही नेते तर सोईचा पक्ष पाहून आगामी काळात पक्षबदल करण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेला धक्का लक्षात घेता अनेक आमदार अस्वस्थ असल्याचं म्हटलं जातंय. असे असतानाच आता भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हेदेखील अस्वस्थ असल्याचं म्हटलं जातंय. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या सूचक विधानानंतर या चर्चेला आता बळ मिळाले आहे.

हर्षवर्धन पाटील अस्वस्थ, लवकरच मोठा निर्णय घेणार?
लोकसत्ता या दैनिकात याबाबत सविस्तर वृत्त देण्यात आलंय. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे हर्षवर्धन पाटील अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते शरद पवार यांच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा चालू आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनीदेखील सूचक विधान केले आहे.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
हर्षवर्धन पाटील हे राज्याचे मोठे नेते आहेत. ते लवकरच योग्य निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय हा राज्याच्या हिताचा असेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. सुळे यांच्या या सूचक विधानानंतर आता इंदापूर मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

इंदापुरातून निवडणूक लढवण्यास उत्सुक
हर्षवर्धन पाटील हे भाजपाच्या तिकिटावर इंदापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. मात्र ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाला जागा, असे सूत्र महायुतीने ठरवल्याचे म्हटले जात आहे. सध्या हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. या जागेवर मंत्री दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. म्हणजेच यावेळच्या विधानसभा निवडणुकीत ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील लवकरच वेगळा मार्ग निवडण्याची शक्यता आहे, असे म्हटले जात आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्यास, तो भाजपासाठी मोठा धक्का असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *