महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ ऑगस्ट ।। ‘मी आस्तिक की, नास्तिक, अशी चर्चा होते. मात्र, सर्वधर्मसमभावाचा विचार देणाऱ्या वारकरी संप्रदायाला मी मानतो. पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेतो; फक्त दर्शन घेताना त्याचा गाजावाजा करीत नाही. दोन मिनिटे तिथे थांबले की, माझ्या मनाला मानसिक समाधान मिळते. या दर्शनाची कधीही प्रसिद्धी करीत नाही. माझ्या अंतःकरणात पांडुरंगाचा, ज्ञानोबा-तुकोबा यांचा विचार असतो’, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी वारकरी संमेलनात दिले.
राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या वारकरी संमेलनाच्या समारोपप्रसंगी पवार बोलत होते. या संमेलनात राज्यभरातून वारकरी सहभागी झाले होते. यावेळी दिंडी सोहळ्याकरिता भजन साहित्य; तसेच वारकरी संप्रदायातील योगदानाबद्दल पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
‘वारकरी संप्रदायात धर्मांध लोकांचा वावर वाढल्याने समाजात कटुता निर्माण होत आहे. ही कटुता संपवून सामाजिक ऐक्य, एकसंध समाज घडवायचा असेल, तर आध्यात्मिक व वारकरी संप्रदायात कार्यरत लोकांनी सक्रिय व्हावे लागेल. तरुण पिढीला विधायक विचार देऊन त्यांची वैचारिक जडणघडण करण्यात संत विचारांच्या मंडळींनी पुढाकार घ्यावा. समाजमन पुरोगामी विचारांवर आधारित असावे.
कर्मकांड, रूढी परंपरा याविरोधात भूमिका घेण्याची गरज आहे. मात्र, वारकरी संप्रदाय, आध्यात्मिक आघाडीच्या नावाने काम करणारे अनेक लोक ठरावीक भूमिकेतून विचार मांडण्यावर भर देत आहेत. त्यातून जाती-धर्मात तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे सुसंवाद करण्याची गरज मला नेहमी वाटते. चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालणाऱ्यांना संप्रदायाने दूर ठेवले पाहिजे. ढोंगी राजकारण, समाजकारण करणाऱ्यांना योग्य वेळी चोप देण्याचे काम संतांच्या विचारांनी केले आहे. त्याच विचारावर आधारित मैत्रीपूर्ण समाज घडवणे आवश्यक आहे’, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.