महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ ऑगस्ट ।। .शहरातील विविध भागात दहीहंडी उत्सव मंगळवारी (२७ ऑगस्ट) साजरा करण्यात येणार आहे. वाहतुकीत बदल करण्यात येणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
शहराच्या मध्य भागातील शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता परिसर, बुधवार चौक ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक, मंडई चौक ते (बाबू गेनू चौक), साहित्य परिषद चौक या ठिकाणी सायंकाळी पाच ते दहीहंडी फुटेपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी सायंकाळी पाचपासून वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहे.
असा असेल वाहतुकीत बदल
– शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटला जाण्यासाठी : स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजी बाबा चौक, टिळक चौक-पुढे टिळक रस्ता, शास्त्री रस्त्याने इच्छितस्थळी जावे.
– पुरम चौकातून बाजीराव रस्त्यावरून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी : पुरम चौकातून टिळक रस्त्याने टिळक चौक व पुढे गोपाळ कृष्ण गोखले रस्त्याने (फर्ग्युसन रस्ता) इच्छितस्थळी जावे. तसेच, पुरम चौकातून सेनादत्त चौकाकडे व पुढे इच्छितस्थळी जाता येईल.
– स. गो. बर्वे चौकातून पुणे महापालिका भवनकडे जाण्यासाठी : स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने-झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.
– बुधवार चौकाकडून अप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतूक सुरू राहील. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बाजीराव रस्त्याने सरळ सोडली जाईल.
– रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतूक बंद राहील.