महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ ऑगस्ट ।। राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा जोर आणखी वाढत चालला आहे.अशामध्ये आजचा दिवस देखील महत्वाचा आहे. कारण हवामान खात्याने कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढचे २४ तास राज्यासाठी खूपच महत्वाचे आहेत. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन केले जात आहे.
आज कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा पावसाचाने जोर धरला आहे. आज पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, नंदुरबार या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक आणि कोल्हापूरला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, जळगाव आणि धुळ्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यासोबतच, विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महत्वाचे म्हणजे राज्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. पुणे, मुंबई, नाशिक या शहरांसह अनेक शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा वाढला आहे. पुढचे काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिला तर धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत राज्यातील अनेक शहरांवर असणारे पाणीसंकट दूर होईल. हवामान खात्याने पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता प्रशासन देखील सतर्क झाले आहे. त्याचसोबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.