महिलांना घरात बसून ई-एफआयआर दाखल करता येणार : पंतप्रधान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ ऑगस्ट ।। महिलांवरील अत्याचार कदापि खपवून घेणार नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी करत असलेल्या उपाययोजनांबद्दल केंद्र सरकार राज्य सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे स्पष्ट करतानाच महिलांच्या रक्षणासाठी कायदे कठोर केले जात आहेत. एफआयआर दाखल करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता आता महिलांना घरातूनच ई-एफआयआर दाखल करता येईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आश्वस्त केले.

जळगाव येथे मोदी यांच्या उपस्थितीत लखपती दीदी सन्मान सोहळा झाला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. न्यायसंहितेच्या माध्यमातून सरकारने कडक कायदे केले आहेत. यापुढे जलद प्रतिसाद मिळेल. अशा प्रकरणात फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा दिली जात आहे. लग्नाच्या नावे फसवणूक होत होती, त्याबाबत कायदा केला आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.

महिलांवरील अत्याचार हा अक्षम्य अपराध आहे. तो करणारा तसेच त्याला पाठीशी घालणारा कोणीही सुटता कामा नये, ही सरकारची भूमिका आहे. कोणत्याही स्तरावर कारवाई करताना आरोपीबाबत बेजबाबदारपणा दाखविणार्‍यांना त्यांची जागा दाखविली जाईल, असा इशारा मोदी यांनी दिला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला अत्याचारात दोषी कुणीही असो, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. तसेच संबंधिताला मदत करणारेही शिक्षेपासून वाचता कामा नयेत. रुग्णालय असो, शाळा, कार्यालय किंवा पोलिस व्यवस्थेतील कोणीही कोणत्याही स्तरावर कारवाई करताना बेजबाबदारपणा दाखवत असेल तर त्यांच्यावरही कडक कारवाई व्हायला हवी. सरकारे येतील अन् जातील; पण नारीशक्तीकडे लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र प्रगत बनवणार
महाराष्ट्राचा विकास करून देशात सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून उदयास आणायचे आहे. आज मी वीर मातांची परंपरा असलेल्या जन्मभूमीवर उभा आहे. जळगाव मुक्ताईची भूमी आहे. बहिणाबाईची कविता रूढी, परंपरेतून बाहेर पडण्यास भाग पाडते; तर शिवाजी महाराजांना दिशा देणारी जिजामाता याच भूमीतील आहे. मुलींना शिक्षण घेऊन पुढे आणणारी सावित्रीबाई याच जन्मभूमीतील आहे. राष्ट्राला पुढे नेण्यात या सर्व मातांचे मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

दोन महिन्यांत 11 लाख भगिनी लखपती!
लखपती दीदींमध्ये दोन महिन्यांत अकरा लाख भगिनी लखपती झाल्या आहेत. यात महाराष्ट्रातील एक लाख भगिनी आहेत. यात अजित पवारांच्या टीमचे पंतप्रधानांनी कौतुक केले. बहिणीची कमाई वाढल्यास पुढची पिढी सशक्त होते. मुलगी कमवायला लागली म्हणजे परिवारामध्ये मान सन्मान मिळतो, परिवाराचे भाग्य बदलते. गेल्या 70 वर्षांचा विचार करा आणि आत्ताच्या दहा वर्षांचा विचार करा. इतकी कामे देशातील भगिनींसाठी आमच्याशिवाय कोणीच व कोणत्या सरकारने केली नसतील, असा दावा पंतप्रधानांनी केला. महायुती सरकारला माझ्या भगिनी मदत करतील व पाठीशी राहतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

राज्याच्या समृद्धीसाठी बहिणी साथ देतील
विकासाच्या मुद्द्यावर बोलताना मोदी म्हणाले, विकसित भारताच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्राचे एक आगळेवेगळे स्थान आहे. महाराष्ट्राचा विकसित भारतामध्ये महत्त्वाचा हात आहे. विदेशी गुंतवणूक असो, नवीन नोकर्‍या असो, नोकरीची गॅरंटी असो, यासाठी महायुतीची गरज आहे. महाराष्ट्राला समृद्धी व विकासाकडे नेण्यासाठी बहिणी साथ देतील, असा विश्वास मोदींनी बोलून दाखवताच महिलांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद दिला.

नेपाळ दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त
महिलांशी संवाद साधताना मोदींनी मराठीमधून सुरुवात केली. नेपाळ येथे झालेल्या अपघातामध्ये मृत कुटुंबाबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. या घटनेतील जखमींना लवकर स्वास्थ्य मिळण्याची प्रार्थना केली. केंद्र व राज्य सरकार त्यांना मदत करण्याचे आश्वासन यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *