Credit Score | EMI वेळेवर भरला नाही तर क्रेडिट स्कोअरवर काय होईल परिणाम?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ ऑगस्ट ।। एखाद्या व्यक्तीने कर्जाचा EMI वेळेवर परत केला नाही किंवा कर्जाची पूर्तता केली नाही, तर त्याचा त्याच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे भविष्यात कर्ज घेणे कठीण होऊ शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेने सिबिल स्कोअरबाबत बँका आणि वित्तीय कंपन्यांना नवीन सूचना जारी केल्या आहेत.

नवीन नियमानुसार, ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर दर १५ दिवसांनी अपडेट केला जाईल. आरबीआयने बँका आणि वित्तीय संस्थांना क्रेडिट स्कोअर त्वरित अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. दर दोन आठवड्यांनी ग्राहकांची क्रेडिट माहिती क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना पाठवण्यास सांगितले आहे.

यामुळे क्रेडिट स्कोअर जलद अपडेट होईल, जो बँका आणि ग्राहक दोघांसाठी फायदेशीर ठरेल. या नियमांनुसार, ग्राहकांचे सिबिल स्कोअर दर महिन्याच्या १५ तारखेला आणि महिन्याच्या शेवटी अपडेट केले जाऊ शकतात. क्रेडिट संस्था आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यादेखील १५ दिवसांच्या अंतराने डेटा अपडेट करण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या निश्चित तारखा सेट करू शकतात.

क्रेडिट संस्थांना प्रत्येक महिन्याला ग्राहकाची क्रेडिट माहिती क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांकडे सादर करणे बंधनकारक आहे. हे पाऊल कर्ज घेणारे आणि कर्ज देणारे या दोघांसाठी फायदेशीर ठरेल.

कारण, बँक आणि एनबीएफसीसाठी योग्य क्रेडिट माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. यावरून त्यांना कोणाला कर्ज द्यायचे आणि कोणाला नाही, याबद्दल अधिक चांगले निर्णय घेण्यास मदत होणार आहे. तसेच त्यावरून कर्जाचा व्याजदर निश्चित करण्यात मदत होईल. यातून चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना कमी दरात कर्ज मिळण्याचा फायदा होईल.

विशेषतः ज्यांच्या कर्जाची परतफेड झाली आहे आणि त्यांचा क्रेडिट स्कोअर सुधारला आहे, त्यांना याचा लाभ होईल. दुसरीकडे बँकांना ग्राहकांच्या जोखमीचे अधिक अचूक मूल्यांकन करता येईल आणि त्यांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध होईल.

क्रेडिट स्कोअर दर १५ दिवसांनी अपडेट केल्यास बँकांकडे ग्राहकांचा अचूक डेटा उपलब्ध असेल. याद्वारे ते समजू शकतील की, कोणता ग्राहक कर्जाची परतफेड करण्यास सक्षम आहे आणि कोणता नाही. यामुळे डिफॉल्टची संख्या कमी होण्याचीही अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *