महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ ऑगस्ट ।। ‘राज्यासह देशात आता अत्याचाराच्या घटनांत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. राज्यातील या घटना आता दबक्या आवाजात चर्चिल्या जात आहेत. अशा घटनांमधील नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अशा प्रकारचे खटले जलदगती (दृतगती) न्यायालयात चालविण्यात यावेत, अशी सरकारची भूमिका आहे. सरकार त्याबाबत पावले उचलत आहे,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
विविध विभागाच्या बैठका घेतल्यानंतर पवार पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. जळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारी आता ऑनलाइन नोंदवून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची सूचना दिली आहे. तक्रारी येत आहेत; त्यामुळे कार्यवाही सुरू करण्यात येत आहे, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.
जुन्या गोष्टी कशाला उकरता?’
शरद पवार यांना पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘भटकती आत्मा’ म्हणाले होते. ‘त्याबाबत पंतप्रधानांना विचारू,’ असे अजित पवार पूर्वी म्हणाले होते. त्यात काल जळगाव येथील कार्यक्रमात पवार आणि मोदी यांची भेट झाली. त्या संदर्भाने अजित पवार यांना विचारताच ते माध्यमांवर भडकले. ‘हे मी निवडणुकीपूर्वी बोललो होतो. आता निवडणुका होऊन बरेच पाणी वाहून गेले आहे. जुन्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यात निवडणुका झाल्या. निकाल लागला. त्यावर नवे काय ते विचारा; पण जुन्या गोष्टी पुन्हा कशाला उकरता?’ असा सवाल करून अजित पवार चिडले. ‘त्याच त्याच गोष्टी विचारणार असाल, तर मी उत्तर देणार नाही,’ असे पवार यांनी ठणकावले.