महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ ऑगस्ट ।। राज्यातील अनेक जिल्ह्यांना गेल्या तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने चांगले झोडपून काढले. या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. अशामध्ये आता हवामान खात्याने राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे. राज्यातील पाऊस ओसरणार असून पुढच्या चार दिवसांत तापमानात वाढ होऊन उन्हाची तीव्रता वाढणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट ते ३० ऑगस्टपर्यंत म्हणजे या चार दिवसांत नांदेड वगळता मराठवाडा, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या १३ जिल्ह्यात हळूहळू पावसाचा जोर कमी होवून दुपारी ३ वाजताच्या सुमारास कमाल तापमानात वाढ होईल आणि हळूहळू उन्हाची ताप वाढण्याची शक्यता जाणवेल.
या १३ जिल्ह्यात दुपारनंतर सायंकाळी झालाच तर तुरळक ठिकाणी फक्त ढगांच्या गडगडाटीसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, दरम्यानच्या चार दिवसांत, मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भ, खान्देश तसंच नाशिक आणि नांदेड अशा २३ जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या पावसाचा जोर असाच राहू शकतो.
कोकण आणि घाटमाथ्यावरील पावसाचे सातत्य पाहता रविवार २५ ऑगस्टपासून सह्याद्री कुशीतील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील धरणांतून होत असलेला पाण्याचा विसर्ग असाच टिकून राहू शकतो. त्यामुळे संबंधित नद्यांच्या काठावर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता कायम आहे.
शनिवार ३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंतच्या सहा दिवसांत संपूर्ण विदर्भ, खान्देश, नाशिक आणि मुंबई अशाया १६ जिल्ह्यात पुन्हा एकदा पाऊस जोर पकडण्याची शक्यता आहे. राज्यातील ऊन- पावसाचा खेळ लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यांवी आणि सतर्क राहावे असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.