महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – ता. १८ – देशातली सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओने मोबाईल जगात क्रांती आणली. मोबाईल इंटरनेट सगळ्यात स्वस्त दरात उपलब्ध करून देऊन जिओने अनेक परदेशी कंपन्याचं दिवाळं काढलं. मात्र, आता हळूहळू जिओमध्येही बदल होताना दिसत आहेत. नुकतंच जिओने दोन रिचार्ज प्लान बंद केले आहेत.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रिलायन्स जिओने अनेक युजर्सना उपयुक्त असलेले सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान बंद केले आहेत. जिओच्या अॅप्लिकेशनवरूनही ते हटवण्यात आले आहेत. 49 रुपये आणि 69 रुपये इतक्याच किमतीचे हे प्लान जिओच्या छोट्या व्हॅलिडिटी प्लानचे भाग होते. म्हणजेच या किमतीच्या रिचार्जवर कमी दिवसांसाठी वैधता उपलब्ध होती.
या दोन्ही प्लान्सना पाच महिन्यांपूर्वी लाँच करण्यात आलं होतं. 49 रुपयांच्या प्लानवर जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग, अन्य नेटवर्कसाठी 250 मिनिट्स आणि 25 एसएमएस तसंच 2 जीबी डेटा अशी सुविधा मिळत होती. तर 69 रुपयांच्या प्लानवर जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग, अन्य नेटवर्कसाठी 250 मिनिट्स आणि 25 एसएमएस तसंच 5 जीबी डेटा अशी सुविधा मिळत होती. अशा प्रकारे युजर्स 14 दिवसांच्या प्लानमध्ये 7 जीबी डेटा वापरू शकत होते.
पण आता हे दोन्ही रिचार्ज प्लान बंद करण्यात आले आहेत. त्याऐवजी कमीत कमी 75 रुपयांचा सगळ्या स्वस्त प्लान घोषित करण्यात आला आहे. या प्लानला 28 दिवसांची वैधता असून रोज 0.1 जीबी इतका डेटा रोज मिळतो. तसंच या प्लानवर जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग, अन्य नेटवर्कसाठी 500 मिनिट्स आणि 50 एसएमएस अशी सुविधा मिळते.