Shivaji Maharaj Statue: “साडेतीनशे वर्षे किल्ल्यांना काही झाले नाही, पण महाराजांचा पुतळा 350 दिवसांत…” कोकणी तरुणांचा व्हिडिओतून संताप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ ऑगस्ट ।। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटमध्ये सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटांचा पुतळा कोसळला. गेल्या वर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे अनावरण केले होते. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर याबाबत देशासह राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या पुतळ्याच्या कामाशी संबंधीत असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी लोकांमधून होत आहे.

अशात आता सोशल मीडियावर कोकणी तरुणांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये हे तरुण या घटनेबद्दल संताप व्यक्त करत आहेत.

व्हिडिओमध्ये काय आहे?
या व्हिडिओमध्ये हे तरुण म्हणत आहेत की, “राजं आम्हाला माफ करा. तुम्ही 350 वर्षांपूर्वी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला आजही अजस्त्र लाटांना तोंड देत उभा आहे. पण राजकोटात तुमचा बांधलेला पुतळा 350 दिवसही झाले नाहीत तो वाऱ्याने कोसळला. ही अख्या महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे.”

या व्हिडिओमध्ये हे तरुण पुढे म्हणतात, “किल्ल्यांवर हल्ले होऊनही ते कधी हलले नाही. मात्र, पैशांवर डल्ला मारणारे तसे करण्यापासून ढळले नाहीत. ज्या राजांचे विचार इतके भक्कम होते त्यांची मुर्ती आपण भक्कम बनवू शकलो नाही. राजे आम्हाला माफ करा.”

कंत्राटदार आणि शिल्पकाराविरुद्ध एफआयआर दाखल
ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटे आणि कंत्राटदार चेतन पाटील यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी अनेक कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे.

सिंधुदुर्ग पोलिसांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्याच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटे आणि कंत्राटदार चेतन पाटील यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे.”

रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनात नौदलाने हा दुर्दैवी अपघात असल्याचे म्हटले आहे. तसंच या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्यासाठी आणि लवकरात लवकर पुतळ्याच्या दुरुस्तीसाठी आणि जीर्णोद्धारासाठी पावले उचलण्यासाठी एक टीम तैनात करण्यात आली आहे.

राज्य सरकार आणि संबंधित तज्ञांसह नौदलाने या दुर्दैवी अपघाताच्या कारणाचा तपास करण्यासाठी आणि लवकरात लवकर पुतळ्याची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करण्यासाठी पावले उचलण्यासाठी एक पथक तैनात केले आहे, असे नौदलाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *