महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ ऑगस्ट ।। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथल्या राजगडावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा 35 फुटी उंच पुतळा कोसळला. यामुळे शिवप्रेमींसह विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रात छत्रपतींचा असा अपमान कधी झाला नाही, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसह शिंदे गटावर टीकेची तोफ डागली. तसेच पुतळा कोसळण्याला 4 व्यक्ती कारणीभूत असल्याचा आरोपही राऊतांनी केला.
मुंबईत माध्यमांसोबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचा पुतळा साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेल्या सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावर उभा करण्यात आला होता. 8 महिन्यापूर्वी उभारलेला हा पुताळा आम्ही कोसताना बघितला. हा महाराष्ट्राच्या हृदयावर झालेला आघात असून तो आम्ही कधीही विसरणार नाही”.
“महाराष्ट्र राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाते. लोकसभा निवडणुकीच्या मतांचा विचार करता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुतळ्याचे उद्घाटन घाई घाईने केलं. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांना सांगण्यात आलं होतं, की या पुतळ्याचे अनावरण घाईघाईने करू नका. मात्र, त्यांनी कुणाचेही ऐकलं नाही. परिणामी महाराजांचा पुतळा कोसळला”.
पुढे बोलताना राऊत म्हणाले “पुतळ्याच्या बांधकामाविषयी शिल्पकलेविषयी अनेक इतिहासकारांनी आक्षेप घेतला होता. त्यात इंद्रजीत सावंत आणि स्वतः संभाजी राजे छत्रपती यांनी काही आक्षेप घेतला होता. औरंगजेबाने अनेकदा महाराष्ट्रावर हल्ले केले आमच्यावर पण छत्रपतींचा असा अपमान मोगल सरदार यांनीही केला नव्हता किंवा त्यांच्या राजांनाही केला नव्हता”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याला 4 व्यक्ती कारणीभूत असल्याचा आरोप केलाय. “याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांना काम दिलं होतं. त्यात किती कमिशन मिळालं या लोकांना त्याचा हिशोब द्यावा लागेल”, असंही संजय राऊत म्हणाले.