IndiGo Fuel Surcharge: ‘आकाशातील प्रवासाला इंधनाचा झटका’! इंडिगोचा फ्यूल सरचार्ज; तिकीट आता आणखी महाग

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ मार्च २०२६ ।। विमान प्रवास म्हणजे आधीच सामान्य माणसासाठी थोडासा चैनीचा प्रकार. पण अलीकडच्या काळात तो चैनीतून थेट खर्चिकपणाकडे झुकताना दिसतो आहे. कारण तिकीट बुक करताना दिसणारी किंमत आणि शेवटी भरावी लागणारी रक्कम यात नेहमीच काहीतरी ‘अधिभार’ उगवतो. आता त्यात आणखी एक भर पडली आहे. देशातील आघाडीची विमान कंपनी IndiGoने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर इंधन अधिभार लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. १४ मार्च २०२६ पासून बुक होणाऱ्या तिकिटांवर हा ‘फ्यूल सरचार्ज’ आकारला जाणार असून तो ४२५ रुपयांपासून तब्बल २,३०० रुपयांपर्यंत असणार आहे. विमान प्रवास आधीच महाग असताना या नव्या निर्णयामुळे प्रवाशांच्या खिशावर आणखी ताण पडणार हे उघडच आहे.

या निर्णयामागे मुख्य कारण म्हणजे विमान इंधनाच्या दरातील प्रचंड वाढ. मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक बाजारात जेट इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटनेच्या International Air Transport Association ‘जेट फ्यूल मॉनिटर’नुसार या भागात इंधनाच्या किमतीत तब्बल ८५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. विमान कंपन्यांच्या खर्चात एव्हिएशन टर्बाइन फ्यूल म्हणजेच Aviation Turbine Fuel हा सर्वात मोठा घटक मानला जातो. त्यामुळे इंधनाच्या दरात अचानक वाढ झाली की त्याचा थेट परिणाम तिकिटांच्या किंमतीवर होतो. इंडिगोनेही याच कारणाचा दाखला देत पूर्ण भाडेवाढ न करता तुलनेने कमी ‘फ्यूल चार्ज’ आकारण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, हा निर्णय घेणारी इंडिगो पहिली कंपनी नाही. यापूर्वीच Air India आणि Air India Express यांनीही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर इंधन अधिभार लागू करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या निर्णयानुसार देशांतर्गत तिकिटांवर सुमारे ३९९ रुपयांचा अधिभार आकारला जात आहे. तसेच सार्क देश, पश्चिम आशिया, आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियातील उड्डाणांसाठी वेगवेगळ्या दरांनी हा सरचार्ज लागू करण्यात आला आहे. थोडक्यात, आकाशात उडणाऱ्या विमानांइतकाच तिकिटांचा दरही उंचावत चालला आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी आता प्रश्न एकच उरतो—प्रवास लवकर करायचा की स्वस्त? कारण आजच्या विमान प्रवासात वेळ वाचतो खरा; पण त्यासाठी खिशातून जास्त इंधन जाळावे लागते, हेही तितकेच खरे. ✈️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *