Narayan Rane , घरात खेचून एकेकाला…; नारायण राणेंचं प्रक्षोभक विधान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ ऑगस्ट ।। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. त्यानंतर राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे हे कार्यकर्त्यांसह तिथे आले होते. मात्र यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. एकाच वेळी दोन्ही नेते पाहणीसाठी आल्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले होते. त्यानंतर नारायण राणे आणि निलेश राणेंनी किल्ल्याच्या मुख्य द्वारावर जाऊन ठिय्या दिला. मात्र यावेळी पोलिसांसोबत हुज्जत घालताना नारायण राणेंनी प्रक्षोभक विधान केलं आहे.

राजकोट किल्ल्यावरी छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत हे पाहणी करण्यासाठी आले होते. त्याआधी भाजप खासदार नारायण राणे आणि निलेश राणे हे कार्यकर्त्यांसह तिथे उपस्थित होते. त्यावेळी घोषणाबाजी झाल्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यानंतर नारायण राणे हे निलेश राणेंसह किल्ल्याच्या मुख्यद्वारापाशी जाऊन थांबले. यावेळी पुढच्या १५ मिनिटांत मुख्य मार्ग मोकळा केला तर आम्ही जाऊ, असं आदित्य ठाकरेंच्या समर्थकांनी म्हटलं. मात्र मुख्य रस्ता सोडून जाण्यास नारायण राणे यांनी नकार दिला. त्यानंतर राजकोट किल्ल्यावर प्रचंड राडा झाला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना मागे हटण्यास सांगितले. मात्र चिडलेल्या नारायण यांनी यावेळी मविआच्या कार्यकर्त्यांना उघड धमकी देत यापुढे पोलिसांना सहकार्य करणार नसल्याचे म्हटलं.

नारायण राणेंची धमकी
“पोलिसांना त्यांना (महाविकास आघाडीला) सहकार्य करायचं असेल तर करा. पण यापुढे आमच्या जिल्ह्यात तुम्हाला असहकार्य असेल. तुम्ही त्यांना येऊद्यात. तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या. मी बघतो. घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकीन. सोडणार नाही,” अशी धमकी नारायण राणे यांनी दिली.

हे बाहेरुन येऊन अंगावर येणार का? – निलेश राणे
“आम्ही आमचा वेळ पोलिसांना दिला होता. त्यानंतरही हे कसं काय घडलं? हे बाहेरुन येऊन अंगावर येत आहेत. हे बाहेरुन येऊन अंगावर येणार का? त्यांना गपचूप निघायला सांगा. आमच्या एकाही कार्यकर्त्याला हात लावायचा नाही. पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना हात लावायचा नाही,” असे निलेश राणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *