महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ ऑगस्ट ।। दरवर्षी राज्यात रस्ते अपघातात १३ ते १५ हजार जणांचा मृत्यू होतो. बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करूनही अनेकजण वाहतूक नियम पाळत नाहीत. या पार्श्वभूमीवर आता मोठ्या प्रमाणावर बेशिस्त वाहनचालकांचे परवाने निलंबित केले जात आहेत. दीड वर्षात राज्यातील तब्बल ३३ हजार ८६६ वाहनचालकांचे परवाने निलंबित केल्याची माहिती परिवहन विभागाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.
पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, नगर, बीड, जळगाव, नागपूर, जालना, मुंबई, ठाणे अशा बहुतेक शहरांमध्ये महामार्गांची कनेक्टिव्हीटी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दुसरीकडे वाहनांचा वेग देखील त्यामुळे वाढला आहे, पण अपघाताचे प्रमाण अपेक्षेपेक्षा अधिकच आहे. वयोवृद्ध किंवा १८ वर्षांखालील मुलांच्या हाती वाहनांची चावी हे देखील अपघाताचे मोठे कारण आहे.
याशिवाय सलग १०- १२ तास ड्रायव्हिंग, क्षमतेपेक्षा अधिक माल किंवा प्रवाशांची वाहतूक, लेन कटिंग, मर्यादेपेक्षा अधिक वेग अशी अपघाताची प्रमुख कारणे आहेत. या पार्श्वभूमीवर बेशिस्तांवर दंडात्मक तसेच परवाना निलंबनाची कारवाई केली जात आहे. मागील दोन महिन्यात देखील जवळपास तीन हजार वाहनचालकांचे परवाने निलंबनाचे प्रस्ताव विविध आरटीओ कार्यालयांकडे दाखल झाले आहेत. याशिवाय महामार्गांवरील खड्डे हे देखील अपघाताचे कारण असून त्याची वेळोवेळी दुरूस्ती जरूरी आहे.
‘हा’ नियम मोडल्यास परवाना निलंबित
वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई तर होतेच, याशिवाय आता त्यांचा परवाना कायमचा रद्द किंवा काही महिन्यांसाठी निलंबित देखील केला जातो. त्यात सिग्नल तोडणे, ओव्हरस्पीड, ओव्हरलोड, मद्यपान, ट्रिपलसिट, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, अशा कारणांसाठी परवाना निलंबित केला जातो.