महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० ऑगस्ट ।। राज्यामध्ये पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आपल्याला आणि गोपीचंद पडळकर यांना तुरुंगात जावं लागेल, असे मोठे विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केले आहे. काल सांगलीमधील विटा येथे झालेल्या सभेदरम्यान ते बोलत होते. नितेश राणे यांनी केलेल्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
काय म्हणाले नितेश राणे?
‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आपल्याला आणि गोपीचंद पडळकरला तुरुंगात जावे लागणार आहे, असे विधान भाजपा आमदार नितेश राणे यांनी सांगलीच्या विटा येथे झालेल्या सभेत बोलताना केले. ऑक्टोंबर मध्ये विधानसभा निवडणुकीत चुकून महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्हा लोकांना कुठे बघाल याचा विचार करून टाका मी आणि गोपीचंद पडळकर दोघेही सहा महिन्यात कोल्हापूरच्या मुख्य जेलमध्ये भेटू आणि आपसात गोट्या खेळत असू,’ असेही ते यावेळी म्हणाले.
१०० दिवसात आत टाकतील
‘आम्हाला तर हे लोक बाहेर ठेवत नाहीत. मला तर पहिल्या 100 दिवसात आत टाकतील, मला तर माहीत आहे. त्यामुळे मी बॅग भरून ठेवली आहे. त्यामुळे मी निर्धार केला आहे आपले सरकार जाऊ द्यायचं नाही. महाराष्ट्र पिंजून काढायचं आणि भाजपाचे आणि आपल्या महायुतीचे सरकार आणून दाखवायचा निर्धार केला. आता राजकारण राहिले नाही, गँगवॉर सुरू झाले आहे. एक दुसऱ्याला मारून टाकण्यापर्यंत विषय जातायत,’ असे मोठे विधानही नितेश राणे यांनी केले.