महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० ऑगस्ट ।। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. झाल्या प्रकाराबद्दल राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी त्यांच्या चरणावर माथा टेकवून शंभरवेळा माफी मागायला तयार आहे. त्यात मला कोणताही कमीपणा नाही, असे सांगत राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवप्रेमींची आणि महाराष्ट्रातील जनतेची गुरुवारी माफी मागितली.
त्याचबरोबर या घटनेवरून सुरू असलेले राजकारणही दुर्दैवी असल्याचे सांगून हा पुतळा पुन्हा उभा राहावा ही तमाम शिवप्रेमींची भावना आहे. हा पुतळा पुन्हा एकदा उभा करून त्या भावना जपणे हा राज्य सरकारचा प्रयत्न आहे आणि लवकरच मालवणच्या राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाईल, असेही त्यांनी सांगितले. ‘पुढारी न्यूज’ चॅनलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त कफ परेड येथील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे ‘महाराष्ट्राचा विकास आणि भविष्यातील वाटचाल’ या विषयावर आयोजित ‘महासमिट 2024’मध्ये दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन मांडताना सध्याच्या ज्वलंत विषयावर आपली परखड मते मांडली.