महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० ऑगस्ट ।। मुंबईत (Mumbai News) सध्या गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2024) धूम सुरु झाली असून हा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातच मुंबईत आणखी एका खास पर्वाची तयारी सुरू झाली असून, या पर्वासंदर्भातील काही गोष्टी थेट न्यायालयापर्यंत पोहोचल्या आहेत. हे पर्व म्हणजे, जैन धर्मियांसाठी अनन्यसाधारण महत्त्वाचं असणारं पर्युषण पर्व.
पर्युषण काळादरम्यान मांसविक्री आणि प्राण्यांची कत्तल यासह मांस खरेदीवर बंदी घालण्यासाठी जैन पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टनं केलेल्या निवेदनासंदर्भात तातडीनं निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी महापालिकांना दिले.
कधी आहे पर्युषण काळ?
यंदाच्या वर्षी 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर यादरम्यान पर्युषण काळ असून, यादरम्यान प्राण्यांची मांसविक्री आणि कत्तल यांच्यावर बंदी घालण्यासंदर्भातील निवेदन शेठ मोतीशॉ लालबाग जैन चॅरिटेबल ट्रस्टनं केलं. मुंबईसह मीरा, भाईंदर आणि नाशिक, पुणे महापालिकांना हे निवेदन देण्यात आलं. याच निवेदनासंदर्भातील निर्णय त्वरेने घेण्याचे निर्देश पालिकांनी द्यावेत अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे या याचिकेसंदर्भातील सुनावणी झाली असून, त्यादरम्यान पालिकांनी या निवेदनावर जलदगतीनं निर्णय घेत निर्देश जारी करण्याच्या सूचना न्यायालयानं केल्या.
हेसुद्धा वाचा : ’50 किमी अंतरावर घर, मग 15 मिनिटांत घटनास्थळी कसा पोहोचला ठाकरेंचा आमदार?’ निलेश राणेंच्या पोस्टनं खळबळ
मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेमध्ये जैन धर्मातील काही महत्त्वाच्या तत्त्वांचा उल्लेख करण्यात आला. या धर्मात अहिंसेला असणारं स्थान अधोरेखित करत त्यामुळं या काळात प्राण्यांची कत्तल झाली तर ते जैन धर्मासाठी हानिकारक ठरेल असंही या याचिकेत म्हटलं गेलं.
पर्युषण पर्वाशी संबंधित जैन धर्मात चालत आलेल्या रुढी…
या पर्वात जैन धर्मिय भक्तिभावानं पूजाअर्चा तरतात. ध्यानधारणेला प्राधान्य देतात.
आत्मा शुद्ध करण्य़ासाठी हा काळ लाभदायी मानला जातो.
या पर्वामध्ये संसयम आणि विवेकबुद्धीचा अभ्यास केला जातो.
या दिवसांमध्ये जैन धर्मिय व्यावसायिक आणि धोका असणाऱ्या कामांपासून दूर राहतात.
पर्युषण पर्वादरम्यान ‘कल्पसूत्र’ किंवा तत्वार्थ सूत्राचं वाचन केलं जातं. हा काळ संतमहात्म्यांच्या सानिध्ध्यात व्यतीत केला जातो.