महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दिनांक २६ फेब्रुवारी २०२६।। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान दुर्घटनेनंतर राज्यभर शोककळा पसरली होती. मुंबईहून सकाळी निघालेले व्हीएसआर कंपनीचे छोटे विमान बारामती विमानतळ परिसरात सकाळी ८.४५ वाजता कोसळले आणि मोठा स्फोट झाला. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. आमदार रोहित पवार यांनीही तपासाच्या पारदर्शकतेबाबत शंका व्यक्त केल्या होत्या. सुरुवातीला ‘ब्लॅक बॉक्स’ जळाल्याची माहिती समोर आली; मात्र आता बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीतील नोंदींमुळे या दाव्याला छेद देणारी माहिती पुढे आली आहे.
पोलीस स्टेशनच्या नोंदीनुसार दुर्घटनेनंतर सापडलेला ‘ब्लॅक बॉक्स’ सुरक्षित अवस्थेत जप्त करण्यात आला होता. याबाबतची स्पष्ट नोंद स्टेशन डायरीत करण्यात आली असून, तो सीलबंद पॅकेजमध्ये ठेवण्यात आल्याचे नमूद आहे. तपासासाठी आलेल्या Aircraft Accident Investigation Bureau (AIB) च्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून बॉक्स सुरक्षित असल्याची नोंद केल्याचेही समोर आले आहे. अधिकाऱ्यांच्या सह्या चारही बाजूंनी घेण्यात आल्याची आणि ऑनलाईन नोंद पूर्ण केल्याची माहिती मिळते. यामुळे ‘ब्लॅक बॉक्स’ पूर्णतः जळाला होता, या सुरुवातीच्या दाव्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
तपास प्रक्रियेत ‘ब्लॅक बॉक्स’ अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानला जातो. त्यातून उड्डाणादरम्यानचे तांत्रिक तपशील, वैमानिकांचे संभाषण आणि यंत्रणांची स्थिती उलगडू शकते. त्यामुळे बॉक्स सुरक्षित असल्याची नोंद तपासासाठी निर्णायक ठरू शकते. एका पॅकेजमध्ये ‘ब्लॅक बॉक्स’सह विमानाचे काही अवशेष ठेवण्यात आल्याचेही समोर आले असून, त्यावर एआयबीचा अधिकृत शिक्का असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, अपघातानंतर पसरलेल्या विविध दाव्यांमुळे जनमानसात संभ्रम वाढला होता. आता पोलिसांच्या अधिकृत नोंदी पुढे आल्याने तपासाची दिशा अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम निष्कर्ष एआयबीच्या सविस्तर अहवालानंतरच समोर येईल. तोपर्यंत या दुर्घटनेभोवतीचे प्रश्न आणि कुतूहल कायम राहणार, हे निश्चित.
