महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ सप्टेंबर ।। आदर्श शाळेतील स्वच्छता कर्मचारी अक्षय शिंदे याने दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी त्याच्यावर दोन वेगवेगळे एफआयआर दाखल झाले आहेत. शनिवारी आरोपीची कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात ओळख परेड झाली. यावेळी दोन्ही चिमुरड्यांनी ‘हाच तो काठीवाला दादा’ म्हणत नराधम अक्षय शिंदेला ओळखले. त्यामुळे आता एसआयटी टीमने चार्जशीट दाखल करून हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात वर्ग केला आहे. नराधमाची ओळख पटल्याने त्याच्या गळ्याभोवतीचा फास आता घट्ट आवळला जाणार आहे.
12 व 13 ऑगस्ट रोजी नराधम अक्षय शिंदे याने चार आणि सहा वर्षांच्या दोन मुलींचे लैंगिक शोषण केले होते. पालकांनी तक्रार करूनही गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी 11 तास लावले होते. याचा संताप म्हणून 20 ऑगस्ट रोजी बदलापूरमध्ये उत्स्फूर्तपणे नागरिक रस्त्यावर उतरले. आठ तास बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनाची दखल कोर्टानेही घेतली.
राज्य शासनाला याप्रकरणी गंभीर दखल घेण्याचे निर्देश दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली. याशिवाय संस्थेचे पदाधिकारी आणि मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल केला. नराधम अक्षय शिंदेला 14 दिवस पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आता तो न्यायालयीन कोठडीत तळोजा कारागृहात आहे. शासनाने याप्रकरणी एसआयटी नेमली असून बदलापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा एसआयटीकडे वर्ग झाला आहे. कल्याण न्यायालयात शनिवारी आरोपीची ओळख परेड झाली.
पाच पंचांसमोर रिफ्लेक्टेड काळ्या काचाच्या माध्यमातून अक्षय शिंदेची ओळख परेड झाली. पंच आणि पीडित मुली एकमेकांना ओळखत नव्हते. यावेळी पीडित दोन्ही चिमुरड्यांनी ‘हाच तो काठीवाला दादा’ म्हणत त्याच्याकडे बोट केले. त्यानेच असभ्य वर्तन केल्याचेही मुलींनी सांगितले. अचानक नराधम समोर आल्यानंतर मुलींनी त्याला काही सेकंदांतच ओळखले. त्यामुळे आता फास्ट ट्रॅक कोर्टात एसआयटी चार्जशीट दाखल करणार असून तातडीने यावर नियमित सुनावणी होणार आहे.