महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ सप्टेंबर ।। राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेला आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली. ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील २५१ एसटी आगारांपैकी ३५ आगार पूर्णत: बंद आहेत. या आगारातून सकाळपासून एकही एसटी बाहेर पडली नाही. पण राज्यातील बाकीच्या आगार अंशत: अथवा पूर्णत: सुरू आहेत. महत्वाचे म्हणजे मुंबई विभागात सर्व आगारातील वाहतूक सुरळीत सुरू आहे. ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार पूर्णतः बंद आहेत.
राज्यभरात एसटी कामगारांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची ७ ॲागस्टला बैठक झाली होती. त्याच बैठकीत २० ऑगस्ट रोजी बैठकीच्या आयोजनाचं पत्र देण्यात आलं होतं. मात्र २० तारीख देऊनही बैठक झाली नाही त्यामुळे एसटी कर्मचारी संतप्त झाले आहेत. वेतनाच्या विषयावर सरकारने बैठक घेतली नसल्याने कामगार संघर्षाच्या तयारीत आहेत. परिणामी ऐन गणेशोत्सवात एसटीच्या आंदोलनाचा कोकणवासियांना फटका बसण्याची शक्यता आहे. एसटी कामगार संघटनेकडून राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं आणि निषेध केला जाणार आहे.
मुंबई सेंट्रलच्या एसटी डेपोमध्ये रत्नागिरीला जाणारी ७.३० वाजताची एसटी अद्याप निघालेली नाही. प्रवाशी संतप्त झाले आहेत. विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरळीत सुरू आहे. तेथे बंदचा इतका प्रभाव दिसून येत नाही. मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात अनेक आगार बंद आहेत. खानदेशात नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, पेठ हे आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. बाकीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू आहे.
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूस हे आगार पूर्णतः बंद आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर हे आगार पूर्णतः बंद आहेत.
पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकातून जाणाऱ्या सर्व बससेवा बंद आहेत. नाईटसाठी आलेल्या बस फक्त बाहेर पडणार आहेत. ड्रायव्हर, डक्टर आणि वर्कशॉपमधील जवळपास ५०० च्यावर कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. स्वागरगेट बस स्थानकावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्वारगेट बस स्थानकावरून बसच्या ये-जा सध्या सुरू आहे. मुबई, ठाण्याकडे जाणाऱ्या बस सुरू आहेत. अजून एसटी बंदचा परिणाम दिसत नाहीये. बाहेरून येणाऱ्या बस येत जाणाऱ्या आता तरी बस जात आहेत. काही वेळानंतर कर्मचारी कामावर येतील का नाही यावरून बंद वर परिणाम होईल.