महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ सप्टेंबर ।। गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली संतधारेने पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजार समितीत आवक घटल्याने सोमवारी (दि. २) नाशिक बाजार समितीत गावठी कोथिंबीरला सर्वाधिक ४५ हजार रुपये प्रति शेकडा इतका भाव मिळाला. तर मेथीनेही भाव खाल्याने २४० रुपये जुडी दराने विक्री झाली.
नाशिक बाजार समितीत सध्यस्थितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर आदी भागांतून पालेभाज्या व फळभाज्या आवक हाेत आहे. मात्र, त्यात पालेभाज्या आवक घटल्याने बाजारभावात वाढ झाली आहे. सोमवारी (दि. २) झालेल्या लिलावात सायंकाळी गावठी कोथिंबीरीस किमान १०० ते सर्वाधिक ४५० रुपये, चायना कोथिंबीर किमान ११० तर सर्वाधिक ४१० रुपये, मेथीला किमान २० तर कमाल २४० रुपये, शेपूला किमान २० तर कमाल ४८ रुपये, कांदापातीला किमान १५ तर कमाल ४५ रुपये जुडीचा भाव मिळाला आहे.