महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०६ सप्टेंबर ।। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भररस्त्यात गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 15 संशयित आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, पोलीस चौकशीत एक चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येचं खरं कारण पोलिसांनी शोधून काढलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वनराज आंदेकर यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड हाच असल्याचा पोलिसांना (Pune Police) संशय आहे. कौटुंबिक आणि संपत्तीचा वाद तसेच पूर्ववैमानस्य आणि बदला घेण्यासाठी आरोपींनी आंदेकर यांची हत्या केल्याची प्राथामिक माहिती आहे.
वनराज यांची बहीण संजीवनी कोमकर आणि मेहुण्याचे किराणा दुकान पाडण्यास लावले होते. त्यावरून झालेल्या वादातून वनराज यांची हत्या झाल्याची तक्रार त्यांचे वडील सूर्यकांत आंदेकर यांनी पोलिसांत दिली आहे. त्याचबरोबर ऑक्टोबर 2023 मध्ये सोमनाथ गायकवाड याचा साथीदार निखिल आखाडे आणि शुभम दहिभाते यांची भररस्त्यात जीवघेणा हल्ला (Crime) करण्यात आला होता.
दोघांवरही कोयत्याने तसेच स्कू-ड्रावरने सपासप वार करण्यात आले होते. ज्यामध्ये निखिल आखाडे याचा मृत्यू झाला होता. ही हत्या आंदेकर यांच्या सांगण्यावरूनच झाली असावी, असा संशय आरोपींना होता. याच हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांनी वनराज आंदेकर यांचा खून केल्याची माहिती आहे.
सोमनाथ गायकवाड याने आपला साथीदार संजीवनी, जयंत, प्रकाश आणि गणेश कोमकर यांच्याशी संगनमत करून वनराज यांच्या खुनाचा कट रचल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. परंतु वनराज आंदेकर यांच्या खुनामागे आणखी काही कारणे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पुणे पोलीस या हत्याकांडाचा कसून तपास करीत आहेत.