![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०६ सप्टेंबर ।। अगदी काटकसर करून आपल्या घरचे आर्थिक बजेट स्थिर ठेवण्याचे काम गृहिणी करत असते. मात्र, ऐन सणासुदीच्या काळातच महागाईने वर डोके काढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. सद्यःस्थितीत प्रमुख डाळींचे भाव शंभरी पार आहेत. तर दररोजच्या वापरात लागणाऱ्या भाज्यासह इतर किराणा सामानात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
दोन दिवसांत गणरायाचे आगमन होत आहे. त्यासोबतच लगेच गौरीचा देखील मोठा सण साजरा केला जातो. यादरम्यान घरोघरी गोडधोड करण्यासाठी किराणा सामानाची मोठी खरेदी करण्यात येत असते.
परंतु रोजच्या वापरात लागणाऱ्या अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये डाळ, गोडेतेल यासारख्या किराणा यादी मधील सामानांनी शंभरी पार केलेली आहे. तर इतर साहित्य देखील वाढलेले आहे. किराणा सामानातील हरभरा डाळ सध्या १०० रुपये किलो आहे. तर तूर डाळीचे भाव १६० रुपये किलो आहेत.
त्यासोबतच मूग आणि उडीद या डाळी सुद्धा शंभर रुपयांच्या पुढे आहेत. तसेच भाज्या व दुधाचे भाव उत्पादन होणाऱ्या ग्रामीण भागातच कडाडले आहेत.शहरी भागामध्ये लसूण सध्या किलोमागे ३०० रुपयांच्या घरात आहे. तर कांदे प्रतिकिलो ६० रुपये असा दर आहे. तसेच रोजच्या आहारात वापरले जाणारा बटाटा देखील ४० रुपये किलोने घ्यावा लागत आहे.
तर एरवी पाच-दहा रुपये प्रति जुडीप्रमाणे मिळणाऱ्या कोथिंबिरीसाठी आता चक्क २० रुपये मोजावे लागत आहेत. या प्रमाणेच इतर भाज्यांची देखील हीच स्थिती आहे. सोबतच आता म्हशीच्या एक लीटर दुधासाठी तब्बल साठ ते सत्तर रुपये तर गायीच्या दुधासाठी प्रतिलीटर ५० रुपये मोजावे लागत असल्यामुळे सर्व सामान्यांना गावरान तूप मिळणे तर आता दुरापास्तच झाले आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती तेवढ्याच; वजन घटले!
सध्या वस्तूंच्या किमती महागल्या आहेत; मात्र किमती वाढविल्यास ग्राहक पर्याय शोधतात, हे लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी किमती तेवढ्याच ठेवल्या. मात्र, वस्तूंचे वजन, आकार कमी केला आहे. साबण, टूथपेस्ट, शाम्पू, फेसवॉश, बिस्किटे आदी वस्तूंना याचा फटका बसला आहे. २० ग्रॅम टूथपेस्टचे वजन १८ किंवा १५ ग्रॅम करण्यात आले आहे. हीच स्थिती शाम्पू, फेसवॉशची आहे; काही कंपन्यांनी बिस्किटाचा आकार लहान केला आहे.
