![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ सप्टेंबर ।। शहर आणि जिल्ह्यात गणेशोत्सवात ७ सप्टेंबर आणि १७ सप्टेंबर रोजी मद्य विक्री बंद राहील. तर, शहराच्या मध्यवर्ती भागातील फरासखाना, विश्रामबाग आणि खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सवाच्या कालावधीत ७ सप्टेंबरपासून १८ सप्टेंबर रोजी मिरवणूक संपेपर्यंत मद्य विक्री बंद राहणार आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी शुक्रवारी (ता. ६) दिला आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मद्य विक्री बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी शुक्रवारी सायंकाळी सुधारित आदेश काढला. त्यानुसार शहर आणि जिल्ह्यात गणेश प्रतिष्ठापनेच्या दिवशी ७ सप्टेंबर रोजी आणि विसर्जनाच्या दिवशी १७ सप्टेंबर रोजी मद्य विक्रीस बंदी राहणार आहे. शहरात १७ आणि १८ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत मद्य विक्रीस बंदी राहील.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरातील फरासखाना, विश्रामबाग आणि खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवावीत, असा प्रस्ताव पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता.
त्यावर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी शहराच्या मध्य भागातील या तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ७ सप्टेंबरपासून १८ सप्टेंबर रोजी मिरवणूक संपेपर्यंत मद्य विक्री बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. तसेच, ज्या दिवशी पाचव्या आणि सातव्या दिवशी विसर्जन मिरवणूक आहे, त्या भागातही मद्य विक्री बंद राहणार आहे.![]()
