महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ सप्टेंबर ।। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे. त्यानुसार राज्यात १२५ जागा जिंकण्याचा निश्चय भाजपने केला आहे. यातील जवळपास ५० जागांवर भाजपला विजयाची खात्री आहे. उर्वरित ७५ जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ‘मिशन १२५’ला अंतिम स्वरूप दिले जात आहे.
७५ जागांसाठी बैठकीत रणनीती
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांशी रविवारी रात्री उशिरा चर्चा केल्याचे समजते. भाजपला कठीण जाण्याची शक्यता असलेल्या ७५ जागांसाठी बैठकीत रणनीती ठरवण्यात आली. शहा यांनी अंधेरी येथील सहारा स्टार हॉटेलमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर भाजप नेत्यांची एक बैठक पार पडली.
‘लालबागच्या राजा’चे आज दर्शन घेणार
शहा सोमवारी सकाळी १०.४५ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर गणरायाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. त्यानंतर ११.१५च्या सुमारास शहा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी जातील. त्यानंतर दुपारी १२.१० मिनिटांनी ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेणार आहेत. तसेच १२.५० मिनिटांनी ते भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या वांद्र्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देतील.
महायुतीच्या सर्व नेत्यांना सुबुद्धी दे
दुसरीकडे, कुठल्याही प्रकारचा वाद होईल अशी वक्तव्य नेत्यांकडून होऊ नयेत यासाठी महायुतीच्या सर्व नेत्यांना सुबुद्धी दे, असे साकडे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी गणपती बाप्पाला घातले आहे. राज्यात यावेळी सहा प्रमुख पक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असल्याने उमेदवारी मिळविण्यासाठी इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे असे होणारच असल्याचेही ते म्हणाले.