महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मँचेस्टर , 22 जुलै : पहिल्या कसोटीत पराभूत झालेल्या यजमान इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत झोकात पुनरागमन करताना वेस्ट इंडीजवर 113 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या लढतीत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या बेन स्टोक्सची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. वल्र्ड टेस्ट चॅम्पयनशिप अंतर्गत दोन देशांमध्ये मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.
इंग्लंडने पाचव्या दिवशी वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी 312 धावांचे आव्हान ठेवले. मात्र वेस्ट इंडीजच्या फलंदाजांना खेळपट्टीवर ठाण मांडून लढत ड्रॉ राखता आली नाही. त्यांचा दुसरा डाव 70.1षटकांत 198 धावांमध्येच गारद झाला. एस. ब्रुक्सने 62 धावांची आणि जे ब्लॅकवूडने 55 धावांची खेळी साकारली, पण दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडकडून कसोटीत पुनरागमन करणाNया स्टुअर्ट ब्रॉडने तीन फलंदाज बाद केले. तसेच खिस वोक्स, डी. बेस व बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
फलंदाजांना शतकी खेळी करावी लागणार -सिमन्स
वेस्ट इंडीज संघाचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले. ते म्हणाले, गोलंदाज त्यांची कामगिरी चोख बजावत आहेत. फलंदाजांनी आपली जबाबदारी ओळखून खेळ करायला हवा. या लढतीतही काही फलंदाजांनी अर्धशतके झळकवली, पण कोणालाही शतक झळकवता आले नाही. याकडे फलंदाजांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे फिल सिमन्स यांना वाटते.