मुस्लिम समाजाच्या नियोजित अनाथाश्रमास एक कोटी रुपयांचा निधी – आमदार शेळके

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० सप्टेंबर ।।  सर्व समाजाने एकोप्याने व गुण्यागोविंदाने राहण्यासाठी सर्व समाजांना न्याय देण्याची भूमिका असली पाहिजे, असे मत मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी आज व्यक्त केले. मुस्लिम समाजाच्या वतीने लोणावळा येथे उभारण्यात येणाऱ्या नियोजित अनाथाश्रमास एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा देखील त्यांनी केली.

लोणावळा नगरपरिषद हद्दीतील मुस्लिम दफनभूमीस संरक्षक भिंत बांधणे, अंगणवाडी केंद्र बांधणे व समाज मंदिर बांधणे या कामांचा शुभारंभ आमदार शेळके यांच्या हस्ते झाला.त्यावेळी ते बोलत होते.

या कामांसाठी सुमारे 1 कोटी 40 लक्ष निधी उपलब्ध झाला असून मुस्लिम बांधवांकडून अनेक वर्षांंपासून या कामांची मागणी होत होती.अखेर या कामांना आज प्रत्यक्ष सुरूवात करण्यात आली आहे.

या कार्यक्रमास लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी अशोक साबळे, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, श्रीधर पुजारी, आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शिवसेना नेते मच्छिंद्र खराडे, राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहराध्यक्ष विलास बडेकर, माजी नगरसेवक प्रमोद गायकवाड, निखिल कवीश्वर, आरोही तळेगावकर, उमा मेहता, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष बाबा मुलाणी, हनिफभाई शेख, झिशान शेख, फरहान शेख, शफी आत्तार, रफिकभाई शेख, मुश्ताक काठेवाडी, लतीफ खान,ॲड.अश्फाक काझी, आशिष बुटाला, जाकीर खलिफा, संजय घोणे, समीर खोले, जयेश देसाई आजी-माजी पदाधिकारी, तसेच सुन्नी मुस्लिम जमात अमलगमेटड ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार शेळके म्हणाले की, मुस्लिम बांधवांच्या मागणीनुसार ही कामे आज सुरू होत आहेत. लोणावळ्यातील मुस्लिम बांधवांनी समाजासाठी नेहमीच मोठे योगदान दिले आहे.प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याची आपली नेहमीच भूमिका आहे.

ट्रस्टच्या वतीने अनाथाश्रमाचा प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यासाठी आपण आत्ताच एक कोटी रुपयांचा निधी जाहीर करीत आहोत. या प्रकल्पाचा सर्वंकष आराखडा मुख्याधिकाऱ्यांनी बनवावा. त्यासाठी दोन कोटी रुपये खर्च येणार असेल, तरी तेवढा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करण्यात येईल,अशी घोषणा आमदार शेळके यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *