तहानलेल्या चऱ्होलीकरांच्या पाणी प्रश्नावर सक्षम तोडगा काढणार – अजित गव्हाणे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० सप्टेंबर ।। चऱ्होली परिसर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गावठाणाबरोबरच येथे अनेक गृहनिर्माण संस्था उभारण्यात आल्या असून, साधारण 20 हजार नागरिक या परिसरात वास्तव्याला आहेत. हा परिसर वेगाने विकसित होत असताना येथे सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी कोणतेही नियोजन व्यवस्थापन करण्यात आलेले नाही हेच या परिसरातील पाणीटंचाईचे कारण आहे. पाणीटंचाईपासून येथील नागरिकांना मुक्त करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील. त्यासाठी सक्षम उपायोजना केल्या जातील असा विश्वास स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिला.

चऱ्होली तसेच गावठाण परिसरामध्ये अजित गव्हाणे यांनी भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी अनेक गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत ‘बाप्पांच्या’ आरतीलाही ते उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप आबा तापकीर, दत्ताभाऊ बुर्डे, कुणाल तापकीर, सागर तापकीर, सुनील पठारे, हरिभाऊ तापकीर, सचिन तात्या तापकीर, संदीप तापकीर, प्रशांत तापकीर, गणेश ताजने, सोमनाथ तापकीर, चेतन तापकीर, शुभम तापकीर राजुशेठ वाखारे, संतोष तापकीर, विक्रम गिलबिले, श्रेयस चिखले आदी उपस्थित होते.

माजी नगरसेविका विनया तापकीर येथील पाणीटंचाई बाबत बोलताना म्हणाल्या, धरण उशाला आणि कोरड घशाला अशी आमची परिस्थिती आहे. शहरातील सर्वात वेगाने विकसित झालेला हा परिसर आहे. मात्र नागरिकांना चार चार दिवस पाणी मिळत नाही. प्रशासकीय कारभार असल्यामुळे अधिकारीही दाद लागू देत नाही. वारंवार टाक्या भरल्या जात नाहीत असे एकच कारण दिले जाते आणि नेहमीच पाणीटंचाई आमच्या माथी मारली जाते. आमच्या भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ठोस उपाय योजना गरजेच्या असल्याचे तापकीर यावेळी म्हणाल्या.

नागरिकांशी संवाद साधताना अजित गव्हाणे म्हणाले चऱ्होली सारख्या विकसनशील भागात पाण्याचे नियोजन करताना पुढील किमान वीस वर्षाचा विचार करणे गरजेचे आहे.

चऱ्होलीसाठी अशाच नियोजनाची गरज आहे. असे नियोजन सध्याच्या राज्यकर्त्यांना जमले नाही ही शोकांतिका आहे. गेल्या दहा वर्षात या भोसरी विधानसभा मतदारसंघाला अधोगतीच्या मार्गावर नेण्याचे काम सत्ताधारी भाजप व त्यांच्या आमदारांनी केले आहे. भोसरी विधानसभेला पुन्हा एकदा विकासाच्या मार्गाने पुढे नेण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

“आम्ही परिवर्तन घडवणार”

यावेळी नागरिक, पदाधिकारी यांनी अजित गव्हाणे यांच्यासमोर परिसरातील समस्यांबाबत चर्चा केली. पाणी टंचाई, खंडित आणि अनियमित वीज पुरवठा, खड्डे यांसारख्या समस्यांमुळे आम्ही त्रस्त आहोत त्यामुळे आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत परिवर्तन घडवणार असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *