महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० सप्टेंबर ।। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा खून करण्यासाठी आरोपींनी परराज्यातून शस्त्रे आणली असून, त्यापैकी चार पिस्तुले, दहा काडतुसे आणि सहा दुचाकी व एक चारचाकी जप्त करण्यात आली आहे; तसेच वनराजचे वडील सूर्यकांत व भाऊ शिवम यांच्यासह नऊ प्रत्यक्षदर्शींकडे चौकशी करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दिली. त्यानंतर आंदेकर खून प्रकरणात त्याची सख्खी बहीण संजीवनी कोमकर, मेव्हणे जयंत व गणेश कोमकर, प्रकाश कोमकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्या पोलिस कोठडीत १२ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली.
या प्रकरणी वनराजचे वडील बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ६८, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी आतापर्यंत सोळा आरोपींना अटक केली असून, तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. आणखी चार जणांचा पोलिस शोध घेत आहेत. आरोपींपैकी आंदेकरची बहीण संजीवनी जयंत कोमकर (वय ४४), जावई जयंत लक्ष्मण कोमकर (वय ५२), गणेश लक्ष्मण कोमकर (वय ३७) व प्रकाश लक्ष्मण कोमकर (वय ५१, सर्व रा. नाना पेठ) आणि सोमनाथ सयाजी गायकवाड (वय ४१, मूळ रा. नाना पेठ, सध्या रा. आंबेगाव पठार, धनकवडी) यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.