महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० सप्टेंबर ।। Pune Vande Bharat Train: पुण्याच्या ट्रॅकवर अखेर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यावर पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस १५ सप्टेंबरपासून धावणार आहे. या रेल्वेला आठ डबे असून, वंदे भारत एक्स्प्रेसची ही अद्ययावत गाडी असणार आहे.
धारवाड, बेळगाव, कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा व कराड या स्थानकांवर या गाडीला थांबा देण्यात आला. पुणे स्थानकावर सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी उद्घाटन सोहळा होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील.
पुणेकर दीड ते दोन वर्षांपासून पुण्याहून वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्याची वाट पाहत होते. पुणे-हुबळीच्या निमित्ताने ही मागणी पूर्ण होत आहे. मात्र, ही रेल्वे पुणे विभागाची नसून, हुबळी विभागाची असणार आहे. त्यामुळे याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी हुबळी विभागाची असणार आहे. पुण्यात वंदे भारत एक्स्प्रेस दाखल झाल्यावर डब्यांची स्वच्छता केली जाईल.
ही वंदे भारत एक्स्प्रेस हुबळी स्थानकावरून पहाटे पाचच्या सुमारास सुटेल. मिरजला सकाळी नऊ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. पाच मिनिटांचा थांबा घेऊन कोल्हापूरला १० वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. कोल्हापूरला १५ मिनिटांचा थांबा आहे.
१० वाजून ३० मिनिटांनी कोल्हापूरहून सुटेल अन् पुन्हा मिरजला सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी येईल. दुपारी चारच्या सुमारास पुण्याला पोहोचेल. पुण्याहून दुपारी ४ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. मिरजला नऊ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. हुबळीला रात्री एक वाजून ५० मिनिटांनी पोहोचणार आहे.
ताशी ११० किमीचा वेग
पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेससाठी ताशी ११० किलोमीटरचा वेग ठरविण्यात आला आहे. मात्र काही मोजक्याच ठिकाणी या वेगाने ही रेल्वे धावेल. पुणे ते सातारा सेक्शनमध्ये काही छोट्या स्थानकांदरम्यान तर ५५ किमी वेगाने ही रेल्वे धावणार आहे. वेग कमी आणि अंतर जास्त अशी या गाडीची अवस्था होणार आहे. कोल्हापूर जोडल्याने अंतर व वेळ वाढणार आहे.