महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० सप्टेंबर ।। आज म्हणजेच मंगळवारी शेअर मार्केटमध्ये तीन IPO उघडत आहेत. यामध्ये पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स, एसपीपी पॉलिमर लिमिटेड आणि ट्रॅफिकसोल आयटीएस टेक्नॉलॉजीजच्या आयपीओचा समावेश आहे. यापैकी पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या आयपीओची बाजारात जोरदार चर्चा होत आहे. पु. ना. गाडगीळ IPOला ग्रे मार्केट मध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स कंपनी अनेक प्रकारच्या दागिन्यांचे व्यवहार करते. यामध्ये सोने, चांदी, प्लॅटिनम आणि डायमंड हे प्रमुख आहेत. देशात ही ज्वेलर्स कंपनी PNG ब्रँड म्हणून ओळखली जाते. कंपनीचे देशभरात 30 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. कंपनीची महाराष्ट्रात सर्वाधिक स्टोअर्स आहेत. अमेरिकेतही त्यांचे स्टोअर आहे. या कंपनीच्या IPOमध्ये तुम्ही 12 सप्टेंबरपर्यंत बोली लावू शकता. म्हणजेच 12 सप्टेंबरला हा IPO बंद होईल.
IPO शी संबंधित 6 खास गोष्टी
1. इश्यू साइज काय आहे?
कंपनीचा इश्यू साइज 1100 कोटी रुपये आहे. IPO च्या माध्यमातून 1100 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. कंपनी 850 कोटी रुपयांचे 1.7 कोटी नवीन शेअर्स आणि 250 कोटी रुपयांच्या OFS अंतर्गत 52 लाख शेअर जारी करेल.
2. प्राइस बँड काय आहे?
या शेअरची किंमत 456 ते 480 रुपये आहे. एका लॉटमध्ये 31 शेअर्स आहेत. यासाठी 14,880 रुपये गुंतवावे लागतील. किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावू शकतो.
3. लिस्ट केव्हा होईल?
IPO चे वाटप 13 सप्टेंबर रोजी होईल. म्हणजेच कोणाला शेअर्स मिळणार आणि कोणाला नाही हे 13 सप्टेंबरला कळणार आहे. 16 सप्टेंबर रोजी डीमॅटमध्ये शेअर्स क्रेडिट्स होतील.
4. IPO च्या पैशांचे कंपनी काय करणार आहे?
IPO द्वारे जमा केलेला निधी महाराष्ट्रात 12 नवीन स्टोअर उघडण्यासाठी, कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाईल.
5. कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे?
आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा महसूल वार्षिक 76 टक्क्यांनी वाढून 4507 कोटी रुपये झाला. कंपनीचा करानंतरचा नफा 35 टक्क्यांनी वाढून 94 कोटी रुपये झाला आहे.
6. ग्रे मार्केटमध्ये IPO ची स्थिती काय आहे?
या कंपनीच्या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बाजार विश्लेषकांच्या मते पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचा सध्याचा GMP अनलिस्टेड मार्केटमध्ये 240 रुपये आहे. ही किमत प्राइस बँडच्या 50 टक्के आहे. अशा परिस्थितीत, हा IPO 50 टक्के प्रीमियमवर लिस्ट होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 50 टक्के नफा होईल.
नोंद – क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.